नामदार गोखले यांच्या वारसालाही संस्था वाचविण्यासाठी जावे लागले सरकारकडे ! | पुढारी

नामदार गोखले यांच्या वारसालाही संस्था वाचविण्यासाठी जावे लागले सरकारकडे !

दिनेश गुप्ता : 

पुणे : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या कारभारावर आक्षेप घेणार्‍या इतर सदस्यांप्रमाणेच संस्थेचे संस्थापक खुद्द नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे नातू अ‍ॅड. सुनील गोखले यांनाही विरोध करण्यात आला. त्यांनी लढता लढता जगाचा निरोप घेतल्यानेच त्यांचा लढा थांबला. पण, अन्य सदस्यांनी आता हे प्रकरण न्यायालयापर्यंत नेले आहे. अ‍ॅड. सुनील गोखले यांनादेखील संस्थेत सुरू असलेला कारभार पटत नव्हता. नामदार गोखले यांनी उभ्या केलेल्या संस्थारूपी वटवृक्षाला वाचविण्यासाठी त्यांनी संस्थेचे विद्यमान सचिव मिलिंद देशमुख यांच्याविरोधात केंद्र सरकारकडे दाद मागितली. देशमुख यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्या वेळीही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचे बोलले जाते. संस्थेच्या कारभाराविरुद्ध लढता लढता त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांचा लढा थांबला. त्यानंतर संस्थेत मर्जीप्रमाणे काम सुरू झाल्यानेच प्रकरण न्यायालयापर्यंत गेले.

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या देशभर शाखा असल्या, तरी संस्थेचे मुख्यालय पुण्यात आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेचा पसारा हाती आल्याने संस्थेत आपल्या विचारांची माणसे असावीत, यासाठी तयारी सुरू करण्यात आली अन् त्यात पदाधिकार्‍यांना यशही आले. मिलिंद देशमुख हे संस्थेचे सदस्य असताना त्यांना सचिव करण्याची शिफारस तत्कालीन अध्यक्ष आर. जी. काकडे यांनी केली. संस्थेत मुख्य पदावर विराजमान होताच देशमुख यांनी काकडे यांच्या वृद्धापकाळाचा फायदा उचलत त्यांच्या सोयीचे ’अर्थपूर्ण’ व्यवहार करीत संस्थेत पकड बसविली, असा आरोप करण्यात आला. त्या वेळी त्यांना नागपूर शाखेचे आर. व्ही. नेवे यांनी विरोध केला आणि त्याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे जाणीवपूर्वक नेवे यांचे मानधन अडवून त्रास देण्यात आल्याचे बोलले जाते. इतर सदस्य महाराष्ट्राबाहेरचे असल्याने ते संस्थेत लक्ष घालू शकत नव्हते. याचाच गैरफायदा घेत संस्थेच्या आर्थिक तिजोरीला मर्जीप्रमाणे रिकामी करणे सुरू राहिल्याचा आक्षेपही घेण्यात आला.

सदस्यभरतीची खेळी
महाराष्ट्रातील अन्य व्यक्ती संस्थेची सदस्य झाल्यास आपल्याला आपल्या मनानुसार काम करता येणार नाही, हे लक्षात येताच देशमुख यांनी आपल्याच घरची मंडळीच सोबत असावी, यासाठी योजना आखली. त्यांचा मेहुणा असलेल्या सागर काळे यांना सदस्य करून घेण्यात आले, तर बहीण रश्मी सावंत यांना कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर स्वतःचा मुलगा चिन्मय देशमुख याला त्यांनी व्यवस्थापक म्हणून नियुक्ती दिली.

गोखलेंचे वारस सरकारदरबारी
सुनील गोखले यांनी सचिव देशमुख यांच्या कारभाराचा अभ्यास केला आणि सोसायटीच्या मानधनापेक्षा अतिरिक्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाची चौकशी करावी, यासाठी अर्ज लिहिला. दुर्दैवाने अचानक सुनील गोखले यांचा मृत्यू झाला अन् त्यांनी सुरू केलेला लढा तूर्त थांबला. मात्र, त्या वेळी राहिलेला तो लढा पुन्हा समोर येण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.

जमिनीची ’माया’
देशभरातील संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांचा कारभार स्वतंत्र असला, तरी त्या-त्या शाखेतील सदस्यांना हाताशी धरून तेथील जमिनीच्या विक्रीतून माया जमवली गेली. त्यात उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील झालेला जमीन गैरव्यवहारही दाबण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात संस्थेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आवाज उठविणार्‍या आशिमचंद्र त्रिपाठी यांना हाताशी घेऊन त्यांच्या मुलाला संस्थेत सदस्य करून घेण्याची खेळी खेळली गेली. अशा अनेक गैरकृत्यांत देशमुख यांनी पुढाकार घेऊन इतर सदस्यांना कोर्ट आणि कायद्याची भीती दाखवत कारभार सुरू ठेवला. या सर्व प्रकारांना रोखण्यासाठीच वरिष्ठ सदस्य आत्मानंद मिश्रा हे न्यायालयीन लढाई लढत असल्याचे सांगण्यात आले.

रानडे ट्रस्ट 16 एकर जमीन प्रकरण उच्च न्यायालयात, बनावट सहीच्या आधारे फसवणूक !
रानडे ट्रस्ट ही सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीला सहकार्य आणि देणगी संस्था असताना आर. जी. काकडे यांच्या वृद्धापकाळाचा गैरफायदा घेतला गेला, असे आक्षेप आहेत. काकडे यांच्याकडून कोर्‍या लेटरहेडवर सह्या घेत नंतर त्यावर सोयीनुसार मजकूर तयार करण्यात आला. रानडे ट्रस्टमध्ये 16 एकर जमीन बळकाविण्यासाठी सचिव मिलिंद देशमुख यांनी त्यांचा मेहुणा सागर काळे यास हाताशी घेऊन तत्कालीन सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या अध्यक्षाच्या बनावट सह्या करून रानडे ट्रस्टची फसवणूक केल्याची तक्रार रानडे ट्रस्टच्या सभासदांनी पोलिसांत केली. चुकीचे काम करूनही ती तक्रार दाबण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. त्यामुळे रानडे ट्रस्टच्या सदस्याला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.

हे ही वाचा : 

मणिपूर हिंसाचारावरील चर्चेसाठी केंद्र सरकार तयार | Manipur violence

गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस! वेतवडे, मांडूकली, अणदूर बंधारे पाण्याखाली | Gaganbawda Heavy Rain

 

Back to top button