सर्व्हन्ट्स सोसायटी बनतेय कौटुंबिक संस्था ! ना. गोखलेंच्या घटनेला दिली तिलांजली

सर्व्हन्ट्स सोसायटी बनतेय कौटुंबिक संस्था ! ना. गोखलेंच्या घटनेला दिली तिलांजली

दिनेश गुप्ता

पुणे : ब्रिटिशांच्या काळात सर्वसामान्यांना शिक्षण सहज मिळावे अन् राष्ट्र निर्माण, राष्ट्र व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्यात स्थापन केलेल्या 'सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी'च्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेस आपली खासगी मालमत्ता समजून मर्जीप्रमाणे नियमबाह्य कामे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेचे तत्कालिन वरिष्ठ सदस्य आणि उपाध्यक्ष आत्मानंद मिश्र यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्त आणि उच्च न्यायालयात तक्रार अर्ज केला असून संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि अन्य सदस्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

राष्ट्र निर्माण व राष्ट्र व्यवस्थापनासाठी शंभर वर्षांपूर्वी नामदार गोखले यांनी 'सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी' स्थापन केली होती. देशभरातील १० प्रांतांमध्ये संस्थेच्या शाखा असून, त्यांच्या नावावर मोठ्या जमिनी तसेच मालमत्ता आहेत. याच जमिनी आता शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या असून संस्थेतील सदस्य त्यावर डोळा ठेवून आहेत. संस्थेच्या मालमत्तेचा फायदा पिढ्यान‌्पिढ्या घेता यावा, म्हणून विद्यमान अध्यक्ष आणि सचिवांनी प्रामाणिक सदस्यांना दूर सारून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले. मग सुरू झाला अडचणीच्या ठरणाऱ्या सदस्यांना संस्थेबाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रवास. या सदस्यांना बाहेर पाठवल्यानंतर आपल्याच कुटुंबातील सदस्यांना सामावून घेण्याचा कागदोपत्री प्रयत्न करण्यात आला, असे याबाबतच्या अर्जात म्हटले आहे.

हे झालेत कुटुंबातील सदस्य

सर्व्हन्टस ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दामोदर साहू यांचा मुलगा पात्र नसतानाही त्याला महाराष्ट्राच्या शाखेचे सदस्यत्व देण्यात आले, तर दुसरीकडे संस्थेत मताधिक्य वाढावे म्हणून उत्तराखंडचे वरिष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी यांच्या नातवालाही सदस्य म्हणून घेण्यात आले. दुसरे सदस्य अमितचंद्र तिवारी यांच्या मुलाने संस्थेत येण्यास नकार दिला असतानाही केवळ आपल्या बाजूचे मताधिक्य वाढवण्यासाठी त्यालाही सदस्यत्व देण्यात आले. विशेष करून या तिघांना सदस्यत्व बहाल करण्याचे कारण म्हणजे संस्थेचे विद्यमान सचिव मिलिंद देशमुख यांचा मुलगा चिन्मय देशमुख याला सदस्यत्व देताना विरोध होऊ नये हे होते, असाही आक्षेप घेण्यात आला आहे.

आड येणारे प्रवीण कुमार संस्थेच्या बाहेर

संस्थेमध्ये गेल्या वीस वर्षांपासून सेवा देणारे प्रवीणकुमार राऊत यांना संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांनी षडयंत्र करून बाहेर काढण्यात यश मिळवले, असाही आक्षेप आत्मानंद मिश्रा यांनी घेतला होता. त्यांच्या मते राऊत हे नागपूरच्या शाखेचे दिवंगत वरिष्ठ सदस्य आर. व्ही. नेवे यांच्या शिफारशीनुसार २००६ मध्ये सेवा सदस्य म्हणून कार्यरत झाले. राऊत हे ग्रामीण विकास केंद्र शेंदूरजना बाजार, जिल्हा अमरावती येथे कार्यरत असतानाही त्यांना २०१८-१९ मध्ये पुण्यात सहकारी सचिव म्हणूनसुद्धा नेमले होते. मात्र, सचिव मिलिंद देशमुख यांना ही निवड खटकली आणि त्यांनी राऊत यांच्या निवडीवरून षडयंत्र रचणे सुरू केले. त्यांनी मानसिक तणावातून राजीनामा देऊन संस्थेतून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रवृत्त केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आत्मानंद मिश्रा यांनी केली तक्रार

आत्मानंद मिश्रा यांनी संस्थेतील आक्षेपार्ह बाबींबाबत मुंबई येथील धर्मादाय आयुक्त आणि पुण्यातील धर्मादाय सहआयुक्तांकडे तक्रार दाखल केली. सार्वजनिक हितासाठी असलेली ही संस्था आता कौटुंबिक संस्था बनत चालली आहे. कायद्याप्रमाणे असे करणे चुकीचे आहे, म्हणूनच मी या विरुद्ध आवाज उठवून कायदेशीर लढा देत आहे. प्रत्यक्षात अध्यक्ष, सचिवांनी मुलास व नातवांना सदस्यत्व देणे हेच बेकायदेशीर आहे. असे करायचे असल्यास संस्थेच्या घटनेनुसार जाहिरात देऊन अर्ज मागवणे बंधनकारक आहे. मात्र, आपल्या कुटुंबातील सदस्यांना सदस्यत्व देण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या सोसायटीच्या नियमांनाच तिलांजली देण्यात आली आहे, असे त्यात नमूद आहे. तक्रारीनंतर धर्मादाय आयुक्तांनी 12 जून रोजी संस्थेस भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना समज देत संस्थेची बदनामी होऊ नये, यासाठी तुमच्या स्तरावर काय तो निर्णय घ्या, असे सांगितले.

पारतंत्र्यामुळे सर्वसामान्यांना राष्ट्रीय शिक्षण मिळावे, या उदात्त उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीची स्वातंत्र्यानंतर दुर्दशा झाली आहे. जमिनीवर डोळा ठेवणे, नातलगांच्या हातीच संस्थेची सूत्रे राहतील, यासाठी डावपेच लढवणे आदी विविध आरोप संस्थेचे एकेकाळच्या पदाधिकाऱ्यांनीच केले आहेत. या संस्थेच्या बुधवारी (दि. १९) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या संस्थेच्या कारभाराचा आढावा घेणारी मालिका आजपासून सुरू करीत आहोत.

हेही वाचा:

Se

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news