दीपेश सुराणा :
पिंपरी : महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सध्या इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटार व्हेईकल मेकॅनिकल आदी प्रमुख ट्रेडला विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळत आहे. या आयटीआयमध्ये सध्या 14 ट्रेड सुरू आहेत. तर, नव्याने 25 ते 30 ट्रेड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यानंतर कंपन्यांच्या सहयोगाने हे ट्रेड सुरू केले जाणार आहेत.
मोरवाडी येथील आयटीआयमध्ये एकूण 14 ट्रेड शिकविले जातात. त्याच्या 36 तुकड्या आहेत. एकूण सुमारे 500 जागांवर विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. तथापि, प्लंबर, शीटमेटल वर्कर या जागांना कमी मागणी असल्याने जवळपास 40 जागा शिल्लक राहतात. वायरमन, आरेखक यांत्रिकी (ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल), रेफ्रिरजरेशन अॅण्ड एसी टेक्निशियन, टर्नर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, वेल्डर आदी ट्रेडलादेखील विद्यार्थ्यांकडून पसंती मिळत आहे.
विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी
आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी मिळते. आयटीआय मार्फत त्यासाठी विविध कारखान्यांमध्ये संपर्क साधण्यात येतो. महापालिकेतसुद्धा काही ट्रेडच्या शिकाऊ उमेदवारीच्या जागा उपलब्ध आहेत. तेथे देखील विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्याचप्रमाणे, विविध कंपन्यांकडून आयटीआयकडे कुशल मनुष्यबळासाठी संपर्क साधण्यात येतो. त्यांच्या मागणीनुसार आयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळते, अशी माहिती आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.
ऑन जॉब प्रशिक्षण मिळणार
पिंपरी-चिंचवड महापलिका आणि टाटा मोटर्स यांच्यात गेल्या महिन्यात तांत्रिक कौशल्याबाबत झालेल्या सामंजस्य करारानुसार मोरवाडी आयटीआय येथील पाच ट्रेडच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टाटा मोटर्समध्ये सहा महिने ते एक वर्ष कालावधीसाठी ऑन जॉब ट्रेनिंगची संधी मिळणार आहे. मेकॅनिकल मोटार व्हेईकल, फीटर, पेंटर (जनरल), शीटमेटल वर्कर, वेल्डर आदी ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी ही संधी दिली जाणार आहे. या काळात त्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे. ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांना अनुभव मिळणार असल्याने ट्रेड उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणूनदेखील काम करता येणार आहे.
नवीन ट्रेडचा प्रस्ताव
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन तंत्रज्ञानावर आधारित 25 ते 30 नवीन ट्रेड सुरू करण्याचे मोरवाडी आयटीआयमध्ये प्रस्तावित आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता झाल्यानंतर पुढील दोन वर्षात बांधकाम करून ही कार्यवाही केली जाणार आहे. त्याशिवाय, शासनाच्या योजनातंर्गत लघुउद्योगांना जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वर्क सेंटर सुरू करता येईल. त्याचा लघुउद्योग व आयटीआय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असे शशिकांत पाटील यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देतानाच त्यांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून उद्योजकता शिबिराचे आयोजन केले जात आहे. संस्थेतून आयटीआयचा ट्रेड उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे किमान 20 ते 25 टक्के विद्यार्थी हे स्वयंरोजगाराचा मार्ग निवडत आहेत.
– शशिकांत पाटील, प्राचार्य, महापालिका आयटीआय, मोरवाडी.
हे ही वाचा :