पिंपरी-चिंचवड महापालिकेची आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सज्ज

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सज्ज
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  भारतीय हवामान विभागाने इतर जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यात 21 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.18) केले आहे. अतपिावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास पालिकेची आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पावसामुळे विविध प्रवाहातून थेट नदीपात्रात येणार्‍या पाण्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते.

या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी पालिकेच्या सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश आयुक्त सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत.

प्रभागनिहाय बीट निरीक्षक, अभियंते व संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांनी पेट्रोलिंग करून पाहणी करावी. अशी बाब आढळून आल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शहरातील ज्या भागात पूरसदृश परिस्थिती उद्भवते, अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. नदीकाठी असणार्‍या शहरातील वस्त्यांमध्ये पालिकेचे पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून उपाययोजना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरू आहे. पालिका भवनात मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष असून, सर्व कक्ष दिवस-रात्र कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. पावसामुळे झाडपडीचे तसेच, इतर आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज आहे. अग्निशमनची टीम बचाव कार्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी दिवस-रात्र कार्यान्वित आहे.

नदीकाठच्या रहिवाशांनी काळजी घ्यावी
पाऊस जास्त प्रमाणात पडल्यास शहरातून वाहणार्‍या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असते. अशा वेळी नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या वस्तू तसेच, जनावरांची काळजी घ्यावी. कोणीही नदीपात्रात उतरू नये, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news