पुणे : कोणीही या अन् फुटपाथवर दुकाने थाटा ; रस्ते विकास महामंडळ प्रशासन सुस्त | पुढारी

पुणे : कोणीही या अन् फुटपाथवर दुकाने थाटा ; रस्ते विकास महामंडळ प्रशासन सुस्त

अजय कांबळे :

कुरकुंभ : मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. येथे कोणीही या अन् फुटपाथवर दुकाने थाटा, अशी स्थिती आहे. मनमाड-बेळगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्ता अपुरा पडत आहे. रस्त्यावर एखादे वाहन थांबले तर दुसर्‍या वाहनाला मार्ग काढताना कसरत करावी लागते. रस्ता नियमानुसार झाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने झाली. मात्र, रस्ते विकास महामंडळ प्रशासनावर कुठलाच परिणाम झाला नाही.
महामार्गावरील गावात, शहरात, ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांची रहदारी असते.

बरेच जण पायी ये-जा करतात. त्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. सध्या हे फुटपाथ पायी जाणार्‍यांसाठी आहेत की अतक्रिमण करण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फुटपाथवर मोठ्या प्रमाणात दुकाने सुरू आहेत. याबाबत स्थानिक ग्रामपंचायती, नगरपरिषद तसेच रस्ते विकास महामंडळ यांना काही देणेघेणे राहिले नाही. रस्ते विकास महामंडळ, नगरपरिषद, ग्रामपंचायती यापैकी कोणाची काय जबाबदारी? हा गोंधळाचा भाग झाला आहे.

प्रशासनाच्या मूग गिळून गप्प बसण्याच्या भूमिकेचा फायदा घेतला जात आहे. पान टपरी, चायनीज, वडापाव, चहा, फळविक्रेते, प्लास्टिक खुर्च्या, ब्लँकेट, उशा, लोड, झोके अशा विविध वस्तू विक्रेत्यांनी फुटपाथवर कब्जा केला आहे. कारवाईची भीती नसल्यामुळे अतिक्रमण करणारे सोकावले आहेत. फुटपाथवर थाटलेल्या दुकानामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. विक्रेत्यांना काही बोलण्याचा प्रयत्न केल्यास दादागिरीची भाषा वापरली जाते.

अतिक्रमणाला सुरुवात झाली तेव्हा रस्ते विकास महामंडळाने कारवाई केली नाही. आता फुटपाथवर मोठ्या प्रमाणात दुकाने सुरू झाली आहेत. फुटपाथवर काही जण शेड ठोकत आहेत. याबाबत रस्ते विकास महामंडळ, स्थानिक प्रशासन काय कारवाई करते? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गावातील लोकांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणालाही देणेघेणे राहिलेले नाही. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून फुटपाथवर दुकाने टाकण्याची स्पर्धा सुरू आहे. या अतिक्रमणामुळे पादचार्‍यांना महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा 

Rainfall in MH | राज्यात मुसळधार! आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्याच्या सूचना

जामखेड : पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार ; 3 जणांना अटक

Back to top button