

पुढारी ऑनलाईन: राज्यातील अनेक भागांना 'रेड' आणि 'यलो' अलर्ट जारी केला आहे. दरम्यान मुंबईसह पालघर, रायगड या जिल्ह्यांसह पश्चिम घाटात तसेच कोकणात धुवाँधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील मुसळधार पावसाची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत.
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. तसेच मदत कार्य आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करावीत, अशा सूचना दिल्या आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
कोकणातील चिपळून आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. चिपळून शहरात देखील सखल भागात पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडून चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे, असे ट्विट अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटवरून केले आहे.
हवामान खात्यानं येत्या चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात. तत्काळ मदतकार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर NDRF ने संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 12 टीम तैनात केल्या आहेत. यामध्ये मुंबईत 5, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी 1 टीम तैनात करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.