खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा चिंता वाढविणारा | पुढारी

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा चिंता वाढविणारा

पुणे/खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 17 जुलैपर्यंत धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तब्बल 61 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या 31 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून सध्या 9.05 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 31.04 टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी 17 जुलैपर्यंत या चारही धरणांत मिळून एकूण 17.67 टीएमसी (60.62 टक्के) पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8.62 टीएमसीने (28.58 टक्के) पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाण्याची चिंता वाढली आहे. यंदा विलंबाने पावसाचे आगमन झाले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन झाले. सुरुवातीला संततधार पावसाने पुणेकर सुखावले. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. अद्यापही धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात 45 मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे 25 मिमी आणि 26 मिमी, तर खडकवासला धरणक्षेत्रात अवघ्या तीन मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दिवसभरात टेमघर धरण परिसरात 20 मिमी, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात प्रत्येकी 15 मिमी आणि खडकवासला धरणक्षेत्रात दोन मिमी पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पाणीकपातीची आढावा बैठक लांबणीवर
खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात 22 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपातीबाबतची बैठक आठवडाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. यंदा अलोनिनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने दर गुरुवारी पाणीकपात लागू केली होती. आता जुलै महिना अर्धा संपला असला, तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला धरणांतील पाणीसाठा 9 टीएमसी झाला आहे.

शहराला दरमहा 1.20 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर सध्या धरण साखळीत शहराला 7 महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास पाणीकपात वाढविण्याची गरज नाही. आणखी एक आठवडा वाट पाहून पाण्याचा आढावा घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला 2 मिमी., पानशेत 15, वरसगाव 15 तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 20 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने धरणातील पाण्याची वाढ सुरूच असून, खडकवासला धरणासाखळीत 9 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा :

बोगस बियाणे विक्रीबाबत कायदा कडक करणार : उपमुख्यमंत्री फडणवीस \

उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक

 

Back to top button