मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांबद्दल केवळ विरोधकांनाच चिंता आहे असे नाही, तर सरकारलाही गांभीर्य आहे. अपुर्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असला, तरी सरकारचे सर्व परिस्थितीकडे लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना प्रत्युत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. बोगस बियाण्यांची विक्री करणार्यांवर कारवाई करणारच; पण यासंदर्भात कायदा अधिक कठोर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी अपुर्या पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्या, त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरले होते. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शासनाला गांभीर्य आहे. अपुर्या पावसासंदर्भात रविवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला आहे. काही भागांत पाऊस कमी आहे. काही भागांत पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत, हे खरे आहे. गेल्यावर्षी या काळात पेरण्या झाल्या होत्या, त्याच्या 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे, नाशिक विभागातील काही भागांत पेरण्या कमी आहेत. पुढचा आठवडाभर पाऊस होणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरण्या योग्यप्रकारे होतील, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात एक समितीदेखील स्थापन करण्यात आली असून, पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, पीक हातून गेले, दुबार पेरणीची वेळ आली; तर त्यासंदर्भात आराखडाही तयार केला असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरात शेतकर्यांना विविध मदतीपोटी 10 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामध्ये नियमित कर्ज भरणारे शेतकरीही आहेत. यातील 16.50 लाख शेतकर्यांपैकी फक्त 50 हजार शेतकरी बाकी आहेत. बाकी सर्वांना मदत दिलेली आहे. केवायसी न झाल्यामुळे त्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे विरोधकांना फक्त चिंता आहे आणि सरकारला चिंता नाही, असे नाही, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.