मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विरोधकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोर्हे यांच्या उपसभापतिपदालाच विरोधकांनी आक्षेप घेतला. चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर गोर्हे यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईच्या मागणीचे पत्र विधिमंडळ सचिवांकडे दिले. राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची त्यांनी भेट घेतली. नीलम गोर्हे यांना उपसभापतिपदावरून हटविण्याची मागणी त्यांनी केली.
कामकाजाला सुरुवात होताच शेकापचे जयंत पाटील यांनी नीलम गोर्हे यांच्या उपसभापतिपदावरच आक्षेप घेतला. विधान परिषदेच्या सभापतिपदावर बसलेल्या व्यक्तीचा कुठलाही पक्ष नसतो. त्यांचे पक्ष सदस्यत्व जाते. माझ्याकडे संसदेचे सगळे नियम आहेत, असे सांगत त्यांनी चर्चेची मागणी केली. त्यावर, नव्या मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिल्याशिवाय कामकाज सुरू होऊ शकत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा परिचय करून दिला.
जयंत पाटील यांनी उपसभापतींबाबत मांडलेल्या मुद्द्यावर हरकत घेतली. सभापतींवर आक्षेप घेता येत नाहीत. त्याचे काही नियम आहेत. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने कामकाज करता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. यावर, विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजीला सुरुवात केली. 'मी लोकशाहीवादी आहे. नियमानुसार गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहून तुम्ही या विषयावर बोलण्याची परवानगी मागितली असतीत, तर माझ्या अधिकारात तुम्हाला अविश्वास ठराव सभागृहात मांडायची परवानगी दिली असती, असे सांगत सभागृह नियमाने चालेल, असे नीलम गोर्हे यांनी विरोधकांना बजावले. त्यानंतर पुढील कामकाज पुकारले.
यावर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी 'आमचे म्हणणे तरी ऐकून घ्या,' अशी मागणी केली. मात्र, त्यांना बोलण्यास परवानगी न मिळाल्याने ठाकरे गटासह काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी उपसभापती नीलम गोर्हे यांच्याविरोधात 'नियमांची पायमल्ली करणार्या सभापतींचा धिक्कार असो,' अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, विलास पोतनीस, सचिन अहिर, तर काँग्रेसचे कॅप्टन अभिजित वंजारी, भाई जगताप आघाडीवर होते. दरम्यान, डॉ. माणिकराव मंगुडकर, प्रभाकर दलाल या माजी विधान परिषद सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहाने श्रद्धांजली अर्पण करत शोकप्रस्ताव मंजूर केला. यानंतर दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले.
अरुण लाड, डावखरे तालिका सभापती
पावसाळी अधिवेशन कालावधीत सभागृहाच्या कामकाजासाठी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा करण्यात आली. निरंजन डावखरे, अरुण लाड, राजेश राठोड आणि नरेंद्र दराडे यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली.