पुणे-मिरज दुहेरीकरण मार्च 2024 पर्यंत होणार? | पुढारी

पुणे-मिरज दुहेरीकरण मार्च 2024 पर्यंत होणार?

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे- मिरज विभागातील 279.05 कि. मी.पैकी आतापर्यंत 164.07 कि. मी. दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुहेरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत असून, या अंतर्गत असलेल्या नांद्रे ते सांगली स्थानकांदरम्यानचे 12.62 किलोमीटरच्या विद्युतीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या कामाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन. पी. सिंह, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाने सांगली स्थानकात नवीन स्थानक इमारत बांधण्यात आली असून, माधवनगर स्थानकावर नवीन स्थानक इमारत अणि प्लॅटफॉर्म देखील बांधण्यात आले आहेत. नांद्रे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सुव्यवस्थित करण्यात आली आहे. ही यंत्रणा दुहेरी रेल्वेची वाहतूक करण्यासाठी महत्त्वाची आहे.

सांगली यार्डात मालगाड्यांसाठी स्वतंत्रपणे दोन रेल्वेलाईन
सांगली स्थानकात नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम बसविण्यात आली असून, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी रिले रूममध्ये वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली आहे. सांगली यार्डात मालगाड्यांसाठी स्वतंत्रपणे दोन रेल्वेलाईन देण्यात येणार आहेत, जेणेकरून मालगाड्यांचे लोडिंग, अनलोडिंग आणि शंटिंग सहज करणे शक्य होईल.

ट्रॅक क्रॉसिंगसाठी रेल्वेगाड्यांना थांबावे लागणार नाही
पावसाळ्यातही हे काम सुरळीतपणे चालू होते आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून पुरेशा मनुष्यबळासह ते वेळेत पूर्ण झाले.आता या रेल्वेमार्गावरील दोन्ही मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरळीत होणार असून, त्यामुळे गाड्या सुरळीत व जलद धावण्यास मोठी मदत होणार आहे. विभागातील ट्रॅकलाईनची क्षमता वाढल्याने आता ट्रॅकक्रॉसिंगकरिता गाड्यांना थांबावे लागणार नाही.

हे ही वाचा : 

पुणे जिल्ह्यातील भागडी येथे बिबट्या अडकला पिंजऱ्यात

चिंता वाढवणारी बातमी ! गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाणीसाठा निम्म्याने कमी

Back to top button