चिंता वाढवणारी बातमी ! गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाणीसाठा निम्म्याने कमी | पुढारी

चिंता वाढवणारी बातमी ! गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाणीसाठा निम्म्याने कमी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यातील रिमझिम पावसाने खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 0.13 टीएमसी इतकी भर पडली आहे. शनिवारी (दि. 15) सायंकाळी पाचपर्यंत या प्रकल्पात 8.50 टीएमसी (29.18 टक्के) पाणीसाठा झाला होता. तर शुक्रवारी धरण साखळीत 8.37 टीएमसी इतके पाणी होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा जवळपास निम्म्याने कमी आहे. गेल्या वर्षी 15 जुलै रोजी या प्रकल्पात 14.11 टीएमसी (48.39 टक्के) इतका पाणीसाठा होता. शनिवारी सकाळपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, खडकवासला परिसरात पाऊस झाला नाही, तर पानशेत व वरसगाव भागांत रिमझिम पाऊस झाला.

रायगड जिल्ह्यालगतच्या घाटमाथ्याच्या डोंगररांगांत हलका पाऊस पडत असल्याने पानशेत व वरसगाव धरणांच्या पाणीसाठ्या संथ गतीने वाढ होत आहे. शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला परिसरात पावसाची नोंद झाली नाही. टेमघर येथे 20 मिलीमीटर, पानशेत येथे 8 व वरसगाव येथे 7 मिलीमीटर पाऊस पडला. दिवसाअखेर टेमघरमध्ये 16.67 टक्के, वरसगावमध्ये 29.33, पानशेतमध्ये 29.80 व खडकवासला धरणात 48.31 टक्के पाणीसाठा झाला होता. \

हेही वाचा :

सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करणाराही मेसेजमधील मजकुराला तेवढाच जबाबदार : उच्‍च न्‍यायालय

पिचाई, नडेलापेक्षाही श्रीमंत भारतीय महिला

Back to top button