हिरकणी कक्षाअभावी स्तनदा मातांची गैरसोय | पुढारी

हिरकणी कक्षाअभावी स्तनदा मातांची गैरसोय

माऊली शिंदे :

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करावेत, असा आदेश देऊन सहा वर्षे झाली आहेत. मात्र, नगररोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील महापालिकेचा दवाखाना, बस स्टँड आणि उद्यानांमध्ये हिरकणी कक्ष अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. यामुळे स्तनदा मातांची गैरसोय होत आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालये, खासगी आस्थापना, संघटित क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता येण्यासाठी हिरकणी कक्ष सुरू करण्याचे आदेश सरकारने गेल्या काळात दिले होते. यानुसार राज्यातील एसटी बस स्थानक, महापालिकेसह विविध कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत; परंतु नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी अद्यापही स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षांची सोय करण्यात आली नाही.

महापालिकेचे मीनाताई ठाकरे क्लिनिक आणि दामोदर रावजी गलांडे दवाखान्यांमध्ये लहान मुलांना लस देण्यासाठी स्तनदा माता येतात. या ठिकाणीदेखील हिरकणी कक्ष नाही. येरवडा, विमाननगर आणि चंदननगर पोलिस स्टेशन, तसेच पोलिस चौकी या ठिकाणी महिलांचा जास्त वेळ जातो. पोलिस स्टेशन आणि पोलिस चौकीमध्ये हिरकणी कक्ष नसल्याने स्तनदा मातांची गैरसोय होत आहे.

उद्यानांमध्येही सुविधेचा अभाव
वडगाव शेरीमधील राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये दिवसाला साधारण एक हजार नागरिक येतात. सुट्टीच्या दिवशी उद्यानात जवळपास तीन ते चार हजार नागरिक येतात. मात्र, या ठिकाणी हिरकणी कक्ष नसल्यामुळे मातांना आपल्या बाळास स्तनपान करता येत नाही. कल्याणीनगर येथील जॉगर्स पार्क, सोमनाथ येथील उद्यान, विमाननगर येथील स्वामी विवेकानंद उद्यान, आनंद पार्क येथील हजारे उद्यान आणि माळवाडी येथील उद्यानामध्येही हिरकणी कक्ष नाही.

कल्याणीनगर उद्यानातील हिरकणी कक्ष लवकरच सुरू केला जाईल. इतर उद्यानांमध्ये हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
-संदीप चव्हाण, अधिकारी, उद्यान विभाग, नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय

Back to top button