रामदास डोंबे
खोर(पुणे) : जलजीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरोघरी फिल्टरयुक्त शुद्ध पिण्याचे पाणी नागरिकांना मिळावे असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कोट्यवधी रुपये खर्च करून या योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात राबविण्यात आल्या आहेत. दौंड तालुक्यातील 33 महसुली गावांतील पाणीपुरवठा योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व 69 गावांच्या पाणीपुरवठा योजना या मिशन अंतर्गत प्रस्तावित करून अनेक ठिकाणीची कामे सुरूदेखील करण्यात आली आहेत. मात्र, या कामांवर कुणाचाच धाक नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
दौंड तालुक्यातील अनेक ठिकाणच्या कामांना तांत्रिक मान्यता मिळाली असून, काही त्यातील अनेक पाणी योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, याच पाणी योजना आज ठेकेदारांच्या निष्काळीपणामुळे अडचणीचा विषय ठरला गेला आहे. आज शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ठेकेदारांना कामे सुरू करण्याचे आदेश देऊन निधी वर्ग करण्यात आला असून, याची देखभाल ही ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील जलजीवन पाणी योजनांच्या कामांचा मोठा भोंगळ कारभार सध्या सुरू आहे.
देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कामाला तब्बल 10 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हे काम सुरू करण्यात आले आहे. वरवंड येथील तलावातून पाणी योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र संबंधित ठेकेदार कामात चुकारपणा करीत असून, प्रशासकीय मान्यतेनुसार जलवाहिनीची खोली ही 1 मीटर असणे आवश्यक आहे.
मात्र, ठेकेदार ही खोली केवळ 2 फुटापर्यंत करीत असल्याच्या कारणावरून गावकर्यांनी व ग्रामपंचायतीने हे काम बंद पाडले आहे. हे काम बंद करून एक आठवडा उलटला असून, ठेकेदार आपले साहित्य घेऊन निघून गेला आहे. गावामध्ये पाणी योजनेच्या टाकीचे कामदेखील सुरू आहे. तब्बल 80 लाख रुपये किमतीचे पाईप आज उघड्यावर पडले आहेत.
या कामाला आज जबाबदार कोण? असा प्रश्न गावकर्यांना पडला आहे. टाकीचे काम सुरू आहे त्या ठिकाणी पाणीदेखील पाच दिवसांपासून कोणी मारत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर यांनी केला आहे. जर ठेकेदार कामात चुका करीत नसेल तर त्याने पळून जायची काहीच गरज नव्हती, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे. ही परिस्थिती दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी घडत असेल का? आणि याचा जाब नेमका या लोकांना कोण विचारणार? हा मोठा गहन प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा