एक टि्वट अन् नराधम गजाआड; पोलिसांच्या सोशल मीडियावरील तक्रारीची दखल | पुढारी

एक टि्वट अन् नराधम गजाआड; पोलिसांच्या सोशल मीडियावरील तक्रारीची दखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आजारी असल्याचा बहाण करून पादचारी मुलीस स्वत:च्या गाडीवरून पुढे सोडण्यास सांगून अश्लील चाळे करणार्‍या सदाशिव पेठतील एकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी त्यांचा मोबाईल नंबर सार्वजनिक केला होता. त्यावर आलेल्या मेसेजची दखल घेऊन पोलिसांनी काही तासांत या नराधमाला अटक केली.

अनुप प्रकाश वाणी (वय 44, रा. शनिवार पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाणी हा अविवहित असून, पूर्वी तो फायनान्स कंपनीत रिकवरी एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या विरुद्ध डेक्कन पोलिसातदेखील गुन्हा दाखल असून, अद्याप पाच तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, 6 जुलै रोजी रात्री 10 वाजता फिर्यादी तरुणी व तिची मैत्रीण सेनापती बापट रोडने बालभारती इमारतीसमोरून सायकल घेऊन पायी जात होत्या. या वेळी एक जण दुचाकीवरून आला. मला चक्कर येत आहे. तुम्ही माझ्याच दुचाकीवरून पुढे सोडा, अशी विनवणी केली. माणुसकीच्या नात्याने तरुणीने त्यास मदत करण्यासाठी त्याची गाडी घेतली. तो पाठीमागे बसला होता. काही अंतरावर गेल्यावर त्याने तरुणीच्या अंगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली.

तरुणीने त्याला बर्‍याच वेळा सांगितले, तरीही त्याचा स्पर्श वाढत होता. तिला भीती वाटल्याने तिने गाडी थांबवून मुलांची मदत मागितली. तोपर्यंत फिर्यादीची मैत्रीण सायकलवरून तेथे आली. तो गाडी घेऊन पळून गेला. दरम्यान, याबाबत पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर तसेच टि्वटरवर या तरुणीचा मेसेज मिळाला. चतु:श्रृंगी पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून व दुचाकीच्या क्रमांकावरून आरोपीचा माग काढला.

आजारी असल्याचा बहाणा करून मुलींकडून लिफ्ट घ्यायचा बहाणा करून तो तरुणींचा विनयभंग करत असे. अशा अनेक घटना शिवाजीनगर, डेक्कन, अलंकार, चतु:श्रृंगी परिसरात केल्याची कबुली वाणी याने दिली आहे. याची माहिती मिळाल्याने अनेक पीडित मुली तक्रार देण्यासाठी समोर येत आहेत. अशा प्रकारची घटना कोणासोबत घडली असेल, तर त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करावी.

– बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

हेही वाचा

फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींसाठी रेड कार्पेट

पंढरपूर : पत्रा उडाल्यानेे चिरला मोटारसायकलस्वाराचा गळा

कोल्हापूर : ‘कस्तुरीचा स्नेहमेळावा’

Back to top button