पंढरपूर : पत्रा उडाल्यानेे चिरला मोटारसायकलस्वाराचा गळा | पुढारी

पंढरपूर : पत्रा उडाल्यानेे चिरला मोटारसायकलस्वाराचा गळा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  चालत्या वाहनातून उडालेल्या पन्हाळी पत्र्याने मोटारसायकलवरील एकाचा गळा चिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी, 12 रोजी चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावर घडली आहे. अमीन दगडू शेख (वय 40, रा. अंबिकानगर, बाळे, सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कय्युम सुभेदार मुजावर (रा. सौंदणे, ता. मोहोळ) व त्यांचे नातेवाईक अमीन शेख हे दोघे मोटारसायकलवरुन (क्र. एम एच 12 एम क्यू 9835) पंढरपुरातून मोहोळकडे निघाले होते. शहरातील अंबाबाई पटांगणाच्या पुढे नवीन पुलावर ते आले असताना त्यांच्यापुढे पन्हाळी पत्रे भरलेले छोटा हत्ती (क्र. एम एच 13 बी क्यू 0491) हे वाहन होते. दरम्यान, अचानक त्या चालत्या वाहनातील एक पत्रा दोरीतून निसटून वार्‍याने उडाला. मागे काही अंतरावर मोटारसायकलवर बसलेल्या अमीन शेख यांच्या गळ्याचा या पत्र्याने वेध घेतला. वेगाने आलेल्या या पत्र्याने शेख यांचा गळा चिरला गेला. त्यामुळे ते मोटारसायकलवरुन खाली कोसळले.

गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तत्काळ त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत कय्युम सुभेदार यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. वाहनचालक सुनील नागनाथ अभंगराव (रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोनकांबळे हे करीत आहेत.

Back to top button