पुणे : उंडवडी कडेपठार येथे दारुचा ट्रक पलटला; नागरिकांनी बाटल्‍या पळवल्‍या | पुढारी

पुणे : उंडवडी कडेपठार येथे दारुचा ट्रक पलटला; नागरिकांनी बाटल्‍या पळवल्‍या

उंडवडी सुपे ; पुढारी वृत्तसेवा

उंडवडी कप (ता. बारामती) आज (शुक्रवार) पहाटे साडेचार वालण्याच्या सुमारास मॅगडोल दारूने भरलेला ट्रक पलटी झाला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र चालक व क्लिनर बचावले आहेत.

ट्रक (एमएच १२ एफसी ६१५०) पिंपळी (बारामती) येथील कंपनी मॅगडोल नं १ दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगावकडे निघाला होता. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गाडी उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर चारीत पलटी झाली. यात जवळपास दारुचे ९५० बॉक्स भरलेले होते, याची किंमत जवळपास ६५ लाख रुपये असल्याची माहिती गाडी चालक निलेश गोसावी व क्लिनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी दिली.

दारुचा ट्रक पलटी झाल्याची बातमी वा-यासारखी आजुबाजुच्या परिसरात पसरली. यावेळी येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या पळवून नेल्या. यात महिलांसह मुलींनीही दारु पळवून नेली.

परंतु चालक व क्लिनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली नसल्यामुळे दारुपुढे माणुसकी कमजोर पडल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळपर्यंत लोकांनी दारु लुटण्यावर भर दिला, परंतु बारामती ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पळ काढला.

गाडी चालक निलेश गोसावी क्लिनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांना दारु नेऊ नये यासाठी प्रयत्न केला. यावेळी लोकांनी चालकाला मारहाण केली, तर गाडीची ताडपत्री सतुर या हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु भरुन नेली. विशेष म्हणजे यात महिलाही सामील असल्याची माहिती गाडीच्या चालकाने पोलिसांना दिली.

Back to top button