विराट कोहली यालाही अटक करणार का? : ऊर्जामंत्री नितीन राऊत | पुढारी

विराट कोहली यालाही अटक करणार का? : ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : वृत्तसंस्था ; टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानने भारतावर पहिल्यांदा विजय मिळवल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. या कृत्याबद्दल देशातील जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. जल्लोष करणार्‍यांना मारहाण करण्यात आली. या कारवाईवर काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटत आहे. अशात काँग्रेसचे महाविकास आघाडीमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाकिस्तानच्या खेळाडूला अलिंगन देणार्‍या विराट कोहली लाही तुम्ही अटक करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला.

पाकिस्तान आणि भारत सामन्यात भारताला दहा विकेटस्नी पराभूत व्हावे लागले. भारताच्या पराभवाचा भारतातच अनेक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले. याची सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटली. यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या नागरिकांवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्यात येत आहे.

मिठी मारल्याचा फोटो व्हायरल

पाकिस्तानने विजय मिळविल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली ने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मिठी मारली होती. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध पाहून अनेकांनी कौतुक केले होते. हीच खेळाची गरज असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, देशात यूएपीए अंतर्गत होत असलेल्या कारवाईमुळे विराट कोहलीलाच अटक करणार का, असा प्रश्‍न नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकीय आणि क्रीडा वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Back to top button