नारायणगाव : दीड महिन्यापूर्वी करण्यात आलेला रस्ता उखडला

नारायणगाव : दीड महिन्यापूर्वी करण्यात आलेला रस्ता उखडला

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : दीड महिन्यापूर्वी वारूळवाडी हद्दीतील सहाणे वस्ती ते पुणे-नाशिक महामार्गाला पोलिस ठाण्याच्या समोरील बाजूस निघणार्‍या रस्त्याचे आमदार निधीतून डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्यावर लगेचच उखडून खड्डे पडल्याने या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सहाणेवस्ती ते कॉलेज रस्त्याला लागून असणार्‍या पुणे-नाशिक महामार्गाकडे निघणार्‍या उपरस्त्याचे डांबरीकरण सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते.

या रस्त्याचे काम करताना शेवटच्या वेळी या रस्त्यावर डांबराचे अस्तरीकरण करण्यात आले होते. या वेळी निकृष्ट दर्जाचे डांबर वापरण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांमधून केला जात आहे. हे डांबरी अस्तरीकरण तप्त उन्हामुळे वितळले गेले व अशाच परिस्थितीत यावरून गाड्यांची ये-जा झाल्याने हे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले गेले. ही बाब स्थानिक प्रशासनाने ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही अद्याप याची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

दरम्यान, रस्त्याचे काम चालू असताना संबंधित विभागाच्या अधिकार्‍याने त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे असताना रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता संबंधित अधिकारी या ठिकाणी फिरकला असेल का?असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदाराला जर या रस्त्याच्या कामाचे पैसे अदा केले असतील तर ते कोणत्या निकषाद्वारे केले असतील असाही प्रश्न आहे. हा रस्ता आमदार निधीतून करण्यात आल्याने आमदारांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे नारायणगाव येथील सहायक अभियंता ज्ञानदेव रायकर यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी संबंधित ठेकेदाराला बोलून रस्त्याची पाहणी केली जाईल, असे सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news