मोहिनी गायकवाड झाल्या सनदी लेखापाल | पुढारी

मोहिनी गायकवाड झाल्या सनदी लेखापाल

निरा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरेखुर्द (ता. पुरंदर) येथील मोहिनी शशिकांत गायकवाड- शिंदे या संसारिक जबाबदार्‍या पेलत संघर्ष करीत कष्ट, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास तसेच आई-वडील, पती व सासरच्यांच्या पाठिंब्यावर चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) झाल्या. या यशामुळे मोहिनी गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहिनी शिंदे-गायकवाड यांचे माहेर होळ (ता. फलटण) होय.

साखरवाडीच्या साखर कारखान्यात नोकरीस असलेले वडील वसंत शिंदे हे दिव्यांग आहेत. आई वाट्याने शेती करीत होत्या. अशा सर्वसामान्य कुटुंबातील मोहिणी शिंदे- गायकवाड यांनी सन 2014 मध्ये सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात बी.कॉम.ला प्रवेश घेतला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कॉलेजला येण्यासाठी त्यांच्याकडे एस.टी.च्या पाससाठी देखील पैसे नव्हते.

त्यातून मार्ग काढून मोहिनी यांनी होळ येथून रोज 30 किलोमीटर सायकलवर प्रवास करून काकडे महाविद्यालयात बी. कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. बी. कॉम.च्या पदवीनंतर पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील शशिकांत गायकवाड या ट्रान्स्पोर्ट कंपनीत नोकरीस असलेल्या तरुणाशी 3 डिसेंबर 2017 ला विवाह झाला. सासरच्या मंडळींच्या पाठिंब्यावर काकडे महाविद्यालयात एम. कॉम.चे शिक्षण सन 2018 मध्ये पूर्ण करीत सीएची तयारी सुरू केली.

लग्नानंतर सांसारिक जबाबदार्‍या पेलत जिद्द, चिकाटी, कष्ट, आत्मविश्वासाने सीएची परीक्षा दिली. नुकत्याच लागलेल्या सीएच्या निकालात पहिल्या प्रयत्नात त्या चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) झाल्या. मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सचिव सतीश लकडे यांनी मोहिनी शिंदे- गायकवाडच्या यशाबद्दल कौतुक करीत सत्कार केला.

हेही वाचा

पवार यांचे यश-अपयश

पीक विम्यासाठी फक्त एक रुपया द्यावा; कृषी विभागाचे आवाहन

सातारा : जिल्ह्याला साथीच्या आजारांचा ‘ताप’; अतिसाराचे ११०४ रुग्ण

Back to top button