आईमुळे घडणार बाप-लेकाची भेट | पुढारी

आईमुळे घडणार बाप-लेकाची भेट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘माझे बाबा कोठे आहेत..? ते मला का भेटत नाहीत..? मला त्यांना भेटायचे आहे…’ काळजाचा ठोका घेणारी ही वाक्ये आहेत ईशान या चारवर्षीय चिमुकल्याची. त्याच्या वडिलांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. यादरम्यान, ईशान त्याच्या वडिलांना भेटला नाही तसेच त्याच्या वडिलांनीही त्याला भेटण्यात रस दाखविला नाही. पोटच्या गोळ्याची वडिलांना भेटण्यासाठी होणारी घालमेल पाहून अखेर आईनेच न्यायालयात वडिलांनी मुलाच्या भेटीसाठी येण्याबाबत अर्ज केला. न्यायालयाने तो मंजूर करीत वडिलांना त्यांच्या मुलाची भेट घेण्याचा आदेश दिला आहे.

मिहिर आणि तुलसी (नावे बदललेली) हे दोघेही आयटीत कामाला आहेत. त्यांना ईशान हा चार वर्षांचा मुलगा आहे. त्या दोघांमध्ये मागील चार ते पाच वर्षांपासून वाद सुरू आहेत. ईशान दीड वर्षाचा असताना तुलसी त्याला घेऊन माहेरी आली. यादरम्यान, मिहिर यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. भांडणामुळे दोघेही वेगळे राहत असून, मिहिर हे गेल्या तीन वर्षांपासून मुलाला भेटलेले नाहीत. त्यामुळे ईशान आईकडे वडिलांना भेटण्याचा हट्ट वारंवार करू लागला.

मात्र, मिहिर यांनीही या काळात मुलाची भेट घेतली नाही. त्यामुळे मिहिर यांनी ईशानची भेट घ्यावी, यासाठी तुलसी यांनी अ‍ॅड. रोहित माळी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. दरम्यान, तुलसी मुलाच्या भेटीवेळी जुन्या भांडणावरून पुन्हा वाद करेल. त्या वादातून माझ्यावर खोट्या तक्रारी दाखल केल्या जातील. भेटीचा अर्ज करून ती घटस्फोटाचा दावा लांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हणणे मिहिर याने न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने दोन्हीकडील बाजू ऐकून घेत तुलसी यांना मुलाच्या भेटीवेळी मिहिरबरोबर वाद करायचा नाही. तसेच ईशानची इच्छा असेल तरच त्याला भेटू द्यायचे, या अटी नमूद करीत मिहिर यांना मुलाला ठरलेल्या वेळेत भेटावे, असे आदेश दिले.

पालकांना भेटणे, हा मुलांचा हक्क

वडिलांना भेटण्याचा मुलाला पूर्ण अधिकार आहे. मुलाची इच्छा असेल तेव्हा त्याने सुनावणीच्या दिवशी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत न्यायालयात आपल्या वडिलांना भेटावे. वडिलांनी त्या वेळेत न्यायालयात हजर राहावे. तसेच भेटीदरम्यान आई किंवा वडिलांना कोणत्याही प्रकारचा वाद करू नये, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

मुलाला भेटल्यानंतर पतीचा विचार बदलेल या भावनेतून पत्नीने हा अर्ज केला होता. मात्र, अर्ज मंजूर झाल्यानंतरही वडिलांनी भेटायची तयारी दाखवली नाही. वडिलांचा सहवास लाभणे हा मुलाचा हक्क आहे, असा युक्तिवाद या दाव्यात करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

– अ‍ॅड. रोहित माळी,
अर्जदार पत्नीचे वकील

हेही वाचा

कोल्हापूर : पोलिस खबर्‍यांचे नेटवर्क गायब!; क्‍लिष्‍ट, गुंतागुंतीच्या गुन्ह्‍यात तपास यंत्रणांची अडचण

राज्यात 26 जुलैपर्यंत सेतू अभ्यासाची अंमलबजावणी

Cabinet Expansion : मंत्रिमंडळात खांदेपालट? शिवसेना, भाजपच्या काही मंत्र्यांना मिळणार डच्चू

Back to top button