

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रचंड दबाव वाढला आहे. या दबावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आठवडा उलटून गेला तरी खातेवाटप होऊ शकलेले नाही. हा विस्तार करतानाच मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एक वर्षानंतर मंत्रिमंडळातून शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. भाजपच्या दोन ते तीन मंत्र्यांना आणि शिंदे गटाच्या तिघांना वगळून त्या ठिकाणी नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याने मंत्रिमंडळातील 29 जागा भरल्या गेल्या आहेत. आता 14 जागा रिक्त आहेत. त्यापैकी असून 4 ते 5 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे उर्वरित 10 जागांसाठी शिवसेना, भाजपच्या कोणाकोणाची वर्णी लागणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः शिंदे गटातील काही आमदारांनी मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढविला आहे.
भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी तर जाहीरपणे मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यातच शिंदे गटातील काही चेहर्यांना वगळण्यात यावे म्हणून भाजप श्रेष्ठींचा दबाव आहे. त्यामध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शिंदेंना या मंत्र्यांना बाहेर काढणे अडचणीचे असल्याने त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
भाजपमध्येही खांदेपालटाची चर्चा आहे. एका वर्षात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे तब्येतीच्या कारणास्तव फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. तर अतुल सावे हे देखील सहकार मंत्री म्हणून प्रभावी ठरलेले नाहीत. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही वगळले जाणार असल्याची चर्चा आहे. सावे यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून त्यांचे खाते बदलावे अशीही एक चर्चा आहे. काही मंत्र्यांना वगळले तरच मंत्रिमंडळाबाहेर राहिलेल्या नव्या चेहर्यांना संधी देता येणार आहे.
17 तारखेपासून सुरू होणार्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची चर्चा असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. केंद्रात भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार आहे. त्यात भाजपकडून धनंजय महाडिक, प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेकडून राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर, प्रतापराव जाधव यांची नावे आघाडीवर आहेत; तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. हा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील.