कोल्हापूर : पोलिस खबर्‍यांचे नेटवर्क गायब!; क्‍लिष्‍ट, गुंतागुंतीच्या गुन्ह्‍यात तपास यंत्रणांची अडचण

कोल्हापूर : पोलिस खबर्‍यांचे नेटवर्क गायब!; क्‍लिष्‍ट, गुंतागुंतीच्या गुन्ह्‍यात तपास यंत्रणांची अडचण
Published on
Updated on

कोल्हापूर, दिलीप भिसे : पोलिस आणि खबरे यांच्यात कधीकाळी केवळ विश्वासार्हतेने माहितीची देवाण-घेवाण चालायची… गंभीर घटनेपूर्वी अथवा त्यानंतरचा सारा घटनाक्रम किंबहुना घडामोडींचे निश्चित धागेदोरे खबर्‍यांच्या नेटवर्कद्वारे यंत्रणांच्या हाती लागायचे… त्यामुळे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांचाही भांडाफोड होत होता. गुन्ह्यांचा नेमका उलगडा होत असल्याने पोलिस यंत्रणांचाही समाजकंटकांवर भारी दरारा राहायचा… अलीकडच्या काळात मात्र काळाच्या ओघात खबर्‍यांचे सारे नेटवर्क स्टॉप झाले आहे. परिणामी, अनेक गंभीर, क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात यंत्रणांची अडचण होत असल्याचे चित्र आहे.

खबर्‍यांचे नेटवर्क विस्कळीत झाल्याने शहर, जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास कागदावरच आहे. कारागृहातील खबरेही चिडीचूप राहिल्याने चारभिंतींआडही कैद्यांना मोकळे आंदण मिळाले आहे. परिणामी, भक्कम सुरक्षा यंत्रणा भेदून गांजा, मोबाईलसह अन्य संशयास्पद वस्तूंची देवाण-घेवाण वाढू लागली आहे.
हायटेक यंत्रणांमुळे खबर्‍यांचे अस्तित्व पडद्याआड!

गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी अलीकडच्या काळात पोलिस यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (टेक्निकल इंटेलिजन्स ) अंमल करीत आहे. त्यात सीसीटीव्ही फुटेजमुळे तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागत असले तरी, गुंतागुंतीच्या गुन्ह्यांत पुराव्यांची साखळी निर्माण करण्यात अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खबर्‍यांची प्रकर्षाने उणीव भासते. हायटेक तपास यंत्रणेमुळे खबर्‍यांचे अस्तित्व काळाच्या ओघात लोप पावत चालले आहे.

खबरे अज्ञातवासात… पंटर मिळकतीच्या शोधात !

खबर्‍यांच्या सतर्कतेमुळे शहर, जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश होवून पोलिस रेकॉर्डवरील अनेक नामचिन गुन्हेगारी टोळ्यांना कारागृहाचा रस्ता धरावा लागला होता. मिरजेत भरदिवसा बॅकेवर पडलेला दरोडा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील टोळीला झालेली अटक हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अलिकडच्या काळात खबर्‍यांची जागा पंटरनी घेतली. काळ बदलला… त्यानंतर झिरो पोलिस या नव्या पात्राची भर पडली. सेटेलमेंट च्या उलाढालीत खबर्‍यांसह पंटर्सही मिळकतीच्या मागे धावू लागले आहेत.

कारागृहातूनही खबरे गायब !

राज्यातील बहुतांशी कारागृहात खबर्‍यांचे भक्कम नेटवर्क असायचे. कारावास भोगणार्‍या प्रत्येक बरॅकमधील दोन, चार कैद्यांना विश्वासात घेवून त्यांना महत्वाच्या टिप्स देण्यात येत होत्या. संघटीत टोळ्यांसह कैद्यांतील हालचालीवर त्यांचा वॉच होता. घटनांची तंतोतंत माहिती वरिष्ठाधिकार्‍यांच्या कानावर पडायची. परिणामी तातडीने मलमपट्टी होतं. अलिकडच्या काळात कारागृहातूनही खबरे गायब झाले आहेत.
बेस्ट डिटेक्शनमुळे होता पोलिसांचा करिश्मा !

सांगली आणि सातारा जिल्ह्यासह पुणे ग्रामीण क्षेत्रातील पोलिस दलाचा गुन्हेगारी जगतावर प्रचंड दबदबा होता. म खबर्‍यांफ च्या भक्कम कनेक्शनमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचा चुटकीसरशी छडा लागला जात. जबरी चोरी, दरोडे घालून पसार होणारे दरोडेखोर संरक्षित अड्ड्यांवर पोहोचण्यापुर्वीच त्याच्या भोवताली पोलिसांचा गराडा पडायचा… त्यांच्या मुसक्या आवळल्या जायच्या… पोलिस दलाचा प्रचंड प्रभाव दिसून यायचा… तत्कालीन पोलिस अधीक्षक भगवंतराव मोरे, तुकाराम चव्हाण, मदन पाटील, सुरेश पवार, मदन चव्हाण, मोहन विधाते, चंद्रकांत शिंदे, संजय ताटे, बाजीराव पाटील,जी.पी. दाभाडे, पंढरीनाथ मांडरे यांच्या बेस्ट डिटेक्शनमुळे कोल्हापूर पोलिस दलाचा करिश्मा होता.

650 नामचीन गुन्हेगार मोकाट!

कोल्हापूरसह जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडे, लूटमारी, बलात्कार, विनयभंग, फसवणुकीसह अनेक गंभीर गुन्ह्यांत सुमारे साडेसहाशेवर गुन्हेगार पोलिसांना चकवा देत पसार आहेत. 'मोका' अंतर्गत कारवाई झालेल्या संघटित टोळ्यांमधील सात-आठ संशयित अजूनही पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येतील दोन संशयित अद्यापही फरार आहेत. याशिवाय रूकडी (ता. हातकणंगले) येथील डॉ. कुलकर्णी व यड्राव फाट्याजवळ (ता. शिरोळ) शेट्टी दाम्पत्याच्या खुनाला सहा-सात वर्षांचा कालावधी झाला; पण मारेकर्‍यांचा तपास लागलेला नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांचे धागेदोरे खबर्‍यांमुळे पोलिसांच्या हाती लागायचे; पण सद्यस्थितीत खबरेच गायब झाल्याने तपास यंत्रणांची तारांबळ उडत आहे. ही बाब स्वत: वरिष्ठाधिकारीही नाकारत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news