पुणे : शरीरसुखाची मागणी केल्याने निर्घृण खून | पुढारी

पुणे : शरीरसुखाची मागणी केल्याने निर्घृण खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मालधक्का येथे डोक्यात दगड घालून खून केला. मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा विद्रूप केल्याचा प्रकार समोर आला होता. मृताची ओळख पटली नसली तरी खून करणार्‍या आरोपीला अटक करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सुरज लल्ली आगवान (वय 35, रा. राजपूर, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. तब्बल 400 पेक्षा अधिक तास व 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

मालधक्का चौकाजवळ 13 जून रोजी एक मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटेल असा काहीही पुरावा नव्हता. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे तपास पथक त्याचा शोध घेत असताना तेथील समाधान देशी दारूच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्याशी एक महिला बोलत असल्याचे दिसून आले. त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली असता 5 जुलै रोजी ती मिळाली.

महिलेकडे चौकशी केल्यावर खून झालेल्या व्यक्तीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. हे तिच्या पतीला समजल्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर सुरज त्याला घेऊन मालधक्का चौकाकडून स्टेशनकडे घेऊन गेला. काही वेळाने तो एकटाच परतल्याची माहिती मिळाली. शाहीर अमर शेख चौकात पोलिसांनी सुरज आगवान याला पकडले. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संदीप मधाळे, रवींद्र गावडे, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी सरक, मनोज भोकरे, अनिल कुसाळकर, किरण तळेकर, मनीष संकपाळ, राजू धुलगुडे यांच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा

पुणे : ऑगस्टमध्ये वाजणार शालेय क्रीडा स्पर्धांचा बिगुल

मुंबईत महाविकास आघाडीबाबत प्रश्नचिन्हच!

भाजपचे डर्टी पॉलिटिक्स; कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची टीका

Back to top button