पुणे : ऑगस्टमध्ये वाजणार शालेय क्रीडा स्पर्धांचा बिगुल | पुढारी

पुणे : ऑगस्टमध्ये वाजणार शालेय क्रीडा स्पर्धांचा बिगुल

सुनील जगताप

पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने घेतल्या जाणार्‍या शालेय क्रीडा स्पर्धा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीची पहिली बैठक पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या मान्यतेने क्रीडा विभाग शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करतात. परंतु, या वर्षी जुलैचा निम्मा महिना संपला तरी नियोजनाची बैठक झालेली नाही. त्यामुळे अनेक खेळाडू स्पर्धेच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षी विविध शाळा सुरू होताना जूनचा शेवटचा आठवडा उजाडला होता. त्यामुळेही शालेय स्पर्धांना उशीर होत आहे.

या खेळांना निधी

क्रीडा विभागाच्या वतीने एकूण 93 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये 49 क्रीडा प्रकारांसाठी निधी उपलब्ध केला जातो. इतर क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. या 49 खेळ प्रकारांमध्ये प्रामुख्याने आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तलवारबाजी, फुटबॉल आदी खेळांचा समावेश आहे.

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी नियोजनाची पहिली बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. या बैठकीमध्ये स्पर्धांचे सर्व नियोजन होणार असून, लवकरच या स्पर्धा राज्यात सर्व ठिकाणी सुरू होतील.

– महादेव कसगावडे,
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबतची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात या स्पर्धा सुरू करण्यात येतील. शासनाच्या निर्णयाप्रमाणे क्रीडा स्पर्धांच्या यादीत समावेश असलेल्या सर्व स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

– सुहास दिवसे, आयुक्त,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय

हेही वाचा

मुंबईत महाविकास आघाडीबाबत प्रश्नचिन्हच!

पुणे : जादूटोण्यासाठी सॉफ्टवेअर अभियंत्याला तब्बल 28 लाखांचा गंडा

पुणे जिल्ह्यात 26 ठिकाणी होणार वाळू उपसा

Back to top button