मुंबईत महाविकास आघाडीबाबत प्रश्नचिन्हच! | पुढारी

मुंबईत महाविकास आघाडीबाबत प्रश्नचिन्हच!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसचे महाविकास आघाडीत सामील होण्याची अजून ठरले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे नेते व कार्यकर्ते विखुरले गेले आहेत. त्यामुळे या फुटीचाही आघाडीवर परिणाम होऊ शकतो.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एकट्याने टक्कर देणे ठाकरे सेनेला शक्य नाही. त्यामुळे अन्य पक्षांची मोट बांधून भाजपशी सामना करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे व शरद पवार प्रयत्नशील आहेत. महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याचे ठाकरे सेना व राष्ट्रवादीत दोन महिन्यांपूर्वीच ठरले आहे, पण आघाडी सामील होण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये अद्यापपर्यंत ठरलेच नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे मुंबई काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील असलेले शरद पवार स्वतःचा पक्ष बांधण्यामध्ये व्यस्त झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठाकरे सेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. मुंबई महापालिकेतील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी या तिन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तिन्ही पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवल्यास मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा थेट भाजपला होऊ शकतो. याबाबत तिन्ही पक्षांमध्ये अनेकदा चर्चाही झाली, पण एकत्र येण्याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा काँग्रेस महाविकास आघाडीत येणे सर्वाधिक फायद्याचे आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसला 16.69 टक्के मतदान झाले होते. हे मतदान शिवसेना-भाजप पेक्षा कमी असले तरी, मनसेपेक्षा दुप्पट होते. त्यामुळे मोदी लाटेतही काँग्रेसला मिळालेल्या या 16 टक्के मतांचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी शरद पवारच चमत्कार घडवून आणू शकतील.

2017 मधील महापालिका निवडणुकीतील टक्केवारी

शिवसेना – 30.41 टक्के
भाजप 28.28 टक्के
काँग्रेस 16.69 टक्के
मनसे 8.52 टक्के
राष्ट्रवादी 5.74 टक्के
समाजवादी पक्ष 4.87 टक्के
अपक्ष 6.40 टक्के

Back to top button