पुणे : उन्हामुळे पाण्याचा तुटवडा, फळभाज्यांना सातत्याने मिळणार्या कमी दरामुळे काढलेली पिके त्यात अद्याप पावसाने अपेक्षेनुसार हजेरी न लावल्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाल्याने पुण्यातील बाजारातही फळभाज्यांच्या आवकेतील घट कायम आहे. घाऊकसह किरकोळ बाजारात फळभाज्यांचे कडाडलेले भाव 'जैसे थे'च असून, किरकोळ बाजारात बहुतांश फळभाज्यांचे भाव शंभरी पार गेले आहेत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 9) 80 ट्रकमधून फळभाज्यांची आवक झाली. राज्यभरात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सूनने हजेरी लावली नाही. येत्या काळात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने पेरणीचा कामाला वेग येईल. मान्सूनने हजेरी लावली तरी आवकेत तत्काळ वाढ होणार नाही. फळभाज्यांची घटलेली आवक आणखी महिनाभर कायम राहील, अशी शक्यता ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी वर्तविली.
परराज्यांतील तामिळनाडू, कर्नाटक येथून 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, इंदौर येथुन गाजर 6 ते 7 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, बेळगाव येथून 100 गोणी भुईमूग, हिमाचल प्रदेश येथून मटार 2 ट्रक मटार, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 7 ते 8 टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 600 ते 700 गोणी, गवार व भेंडी प्रत्येकी 6 ते 7 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे साडे चार ते 5 हजार क्रेट्स, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमुग शेंग 90 ते 100 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, इंदौर व आग्रा भागातून बटाटा 30 ते 35 ट्रकमधून बाजारात दाखल झाला.
हेही वाचा