पुढारी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला उद्धव ठाकरेंच्या गटाने आव्हान दिले आहे. ही याचिका सुनावणीसाठी ३१ जुलै रोजी सुचीबद्ध करू, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Shiv Sena symbol row)
शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली जावी, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला होता.
निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्हावर शिंदे गटाचा अधिकार राहील, असा निकाल दिला होता. ठाकरे गटासाठी अर्थातच हा मोठा धक्का होता आणि या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.