

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देश-विदेशातील पर्यटकांची धार्मिक स्थळांना भेट अन् वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती, यामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे धार्मिक संस्थांनीही पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, टि्वटर आणि यू-ट्यूबद्वारे धार्मिक स्थळांविषयीची संपूर्ण माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ लोकांपर्यंत पोचविले जात आहेत. त्यामुळेच आता सोशल मीडियावरून स्थळांची ऐतिहासिक-सांस्कृतिक माहिती घेऊन पर्यटक धार्मिक स्थळांना भेट देत आहेत. पर्यटकांचा ओढा लक्षात घेत धार्मिक संस्थाही तंत्रस्नेही बनल्या आहेत.
पुण्यातील धार्मिक स्थळांना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर आदी देशांसह राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील पर्यटक भेट देत आहेत. धार्मिक संस्थांनीही काळाप्रमाणे बदलत धार्मिक स्थळांची माहिती पर्यटकांना आधीच मिळावी, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी जाणून घ्यावी, यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संस्थांनी विशेष नियोजन केल्याचे दिसून येते.
ऑनलाइन प्रसिद्धीसह विविध उपक्रमांची माहिती अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक-इन्स्टाग्राम पेजद्वारे लोकांपर्यंत पोचविली जात आहे. याद्वारे धार्मिक स्थळांची, कार्यक्रमांची माहिती जगभरातील लोकांना मिळत आहे. या प्रसारासाठी काही संस्थांनी सोशल मीडिया टीमही तयार केली आहे. पुण्यातील विविध धार्मिक स्थळांकडे पर्यटकांचा ओढा आहे. त्यात ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, चतु:शृंगी देवी मंदिर, सारसबाग गणपती मंदिर, अशा विविध धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
पुण्यातील धार्मिक पर्यटनाला गेल्या वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आताही धार्मिक पर्यटन बहरले आहे. अनेक पर्यटक पुण्यातील धार्मिक स्थळांना भेट देत असून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालाही भेट देणार्यांची संख्याही मोठी आहे. मंदिराविषयी लोकांना माहिती मिळावी, यासाठी ट्रस्टकडून सोशल मीडियाचाही वापर केला जात असून, श्री गणरायाच्या ऑनलाइन दर्शनाचीही सुविधा केली आहे
– महेश सूर्यवंशी
कोशाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ
हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
हेही वाचा