पंढरपूर : रोपळे येथील शेतकर्‍याची केळी इराणच्या बाजारपेठेत | पुढारी

पंढरपूर : रोपळे येथील शेतकर्‍याची केळी इराणच्या बाजारपेठेत

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  शेतीत अनेक तरुण शेतकरी विविध प्रयोग करीत आहेत. यामध्ये त्यांना यशही मिळत आहे. रोपळे (ता. पंढरपूर) येथील युवा शेतकरी हनुमंत भारत शितोळे यांच्या शेतातील केळी थेट इराणच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. आतापर्यंत पाच एकर केळीबागेतून 70 टन केळीची निर्यात केली आहे, तर एकूण 225 टन केळीचे उत्पादन होणे अपेक्षित असल्याने शेतकर्‍याने सांगितले.

केळी उत्पादक शेतकरी हनुमंत शितोळे म्हणाले की, जी-9 या जातीच्या केळीची 2 ऑगस्ट 2022 रोजी पाच एकर क्षेत्रावर लागवड केली. यासाठी दोन ओळीतील अंतर सहा फूट, तर दोन रोपांमधील अंतर पाच फूट ठेवले. लागवडीपूर्वी एकरी सहा डंपर शेणखत व कांदा विस्कटला. त्यानंतर तीन आठवड्यांनी केळीची लागवड केली. त्यानंतर केळीच्या रोपांची पांढरी मुळी चालावी यासाठी ह्युमीक अ‍ॅसिड सोडण्याचे नियोजन केले.

पीकशास्त्राच्या दृष्टिकोनातून केळी पिकाला योग्य जीवनद्रव्ये मिळविण्यासाठी सूक्ष्म नियोजनाची गरज असते. त्यानुसार केळीची वाढ व्हावी यासाठी दर आठ दिवसाला 19ः19 ची फवारणी करण्यात आली. त्यानंतर पिकाच्या संरक्षणासाठी बुरशीनाशके व कीटकनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी केली. लागवडीस तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पावर ट्रिलरच्या सहाय्याने बांधणी करुन बेलस्ट डोस देण्यात आला. त्यानंतर सलग दोन महिने प्रत्येक आठ दिवसांनी एकरी पाच किलो याप्रमाणे 13ः0ः45 ड्रीपव्दारे सोडले. या सर्व नियोजनबध्द औषध सोडणे व फवारणीमुळे केळीच्या झाडांना बळकटी येऊन त्यांची वाढ चांगल्याप्रकारे झाली.

केळीची वेण होताना ड्रोनव्दारे फवारणी करुन पिकाचे रोगराईपासून संरक्षण केले. त्यानंतर केळीचे फळ फुगणे व चकाकी येण्यासाठी एकरी पाच किलो प्रमाणे 0ः60ः20 ची मात्रा सोडली. या सर्व खतमात्रा दिल्यामुळे केळीच्या घडांची वाढ योग्य व वेगाने होण्यास मदत झाली. सध्या बागेमध्ये 32 ते 40 किलो वजनाचे घड आहेत, तर 55 किलो वजनाचा सर्वात मोठा घड बागेमध्ये उत्पादित झाला आहे.

पाच एकर केळी बागेतून निवडून आतापर्यंत 70 ते 80 टन केळी बाजारात पाठविली आहे. त्यास सुमारे 17 ते 20 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. यापैकी सुमारे 70 टन केळी ही इराणच्या बाजारपेठेमध्ये पाठविली असून त्यास तेथे चांगली बाजारपेठ मिळाली आहे. यातून आतापर्यंत सुमारे 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बागेमध्ये अद्यापही भरपूर केळी शिल्लक आहे. सुमारे 225 टन एकूण केळी या पाच एकराच्या केळी बागेतून उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असून सुमारे 30 लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
– हनुमंत शितोळे शेतकरी, रोपळे

Back to top button