नेवासा नगरपंचायत हालचालींना वेग | पुढारी

नेवासा नगरपंचायत हालचालींना वेग

कैलास शिंदे : 

नेवासा : नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्या अधिच हालचालींना वेग आला आहे. परंतु, कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर नेवाशातील इच्छुकांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. नगरसेवकांपेक्षा नगराध्यक्षपदांचीच चर्चा अधिक आहे.
नेवासा नगरपंचायत अगोदर की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होतील याविषयी जनतेत उलटसुलट चर्चा होत आहेत. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार्‍या दिवाळी अगोदर की, नंतर होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा होत असताना आता राज्य शासनाने जुलै अखेरपर्यंतच्या मतदार याद्या आगामी नगरपरिषद, नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे संकेत दिल्याने नेवाशातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नेवासा शहरामध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या सुप्त हालचाली सुरू आहेत. जो तो इच्छुक उमेदवार काहीही न बोलता सुप्त अवस्थेत गाठीभेटी घेताना दिसतो. आस्थेवाईक पणे विचारपूस करत असताना आपण इच्छुक असल्याचे दाखवित नव्हता. परंतु, शासनस्तरावर निवडणूक हालचालींकडे मात्र इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने व जनतेतून होणार असल्याने नगरसेवकपेक्षा नगराध्यक्षपदावर अनेकांना डोळा असल्याचे दिसत आहे.

नगरसेवकांपेक्षा नगराध्यक्षपदांच्या नावांची चर्चा उघडपणे होतांना दिसत आहे. ही नेवासा नगरपंचायत आमदार शंकरराव गडाख गटाच्या ताब्यात आहे. गडाख व विरोधी भाजपकडूनही निवडणुकीच्या चर्चा व हालचाली सुरू झालेल्या आहेत. दोन्ही गटाकडू नगराध्यक्षपदांच्या नावांची चाचपणी होताना दिसते. यापदासाठी गडाख गटाकडून काकासाहेब गायके, नंदकुमार पाटील, रामभाऊ जगताप, राजेंद्र घोरपडे तर भाजपकडून सुनीलराव वाघ व निरंजन डहाळे, मनोज पारखे यांच्या नावांची चर्चा आहे. नगराध्यक्षपदांसाठी होणारी लढत लक्षवेधी होणार आहे.

ओबीसी आरक्षणाकडे लक्ष लागून!
नेवासा नगरपंचायतीच्या 17 नगरसेवकपदांसह नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. 17 प्रभागातील आरक्षण पूर्वी निघाले आहे. परंतु, ओबीसी आरक्षण लागू झाले तर पुन्हा प्रभाग आरक्षण सोडत होवू शकते अन्यथा आहे त्या प्रभाग आरक्षणानुसार निवडणूक होण्याची शक्यता आहे.

अनेकांमध्ये ‘बहार’ फुलला..!
नगरसेवक पेक्षा नगराध्यक्षपदांच्या हालचाली अधिक आहेत. अनेकांना त्यामुळे माणुसकीचा पाझर फुटलेला दिसत आहे. चौकामध्ये न दिसणारे आता दिसू लागले आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये बहार येत आहे. नव्हे बहार फुलला आहे..!

हे ही वाचा :

शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत ईव्हीएम !

नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून

Back to top button