मंचर : भोरवाडीत सेवा रस्त्याचे काम बंद पाडले | पुढारी

मंचर : भोरवाडीत सेवा रस्त्याचे काम बंद पाडले

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक महामार्गालगत सेवा रस्त्याबाबत शासनाने नागरिकांना योग्य माहिती न दिल्याने नागरिकांनी शनिवारी (दि. 8) काम बंद पाडले. शासनाने भोरवाडी परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी विकास भोर आणि प्रवीण भोर यांनी केली. शंकानिरसनानंतर काम पूर्ववत सुरू केले. पुणे-नाशिक महामार्गानजीक भोरवाडी हे गाव आहे. त्यांची स्मशानभूमी रस्त्याच्या पश्चिमेस आहे. शाळेतील लहान मुले, विद्यार्थी, शेतकरी, प्रवाशांना या ठिकाणी रस्ता क्रॉस करणे अवघड बनले आहे. त्यामुळे महामार्गाच्या पूर्वेस भोरवाडी हद्दीत सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू झाले होते.

परंतु, काम कसे होणार, पुलाची उंची किती, किती लांबीचा सर्व्हिस रस्ता, अशा नागरिकांना शंका होत्या. त्यातच काम सुरू केल्याने पोकलेन मशिन काम करीत असताना पाण्याची लाइन तुटल्याने संतप्त नागरिकांनी काम बंद पाडले. विकास भोर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोर, उद्योजक दिनेश खुडे, किरण भोर, सागर भोर, सुनील भोर, लक्ष्मण शिंदे, कल्याण भोर, नॅशनल हायवे उपअभियंता दिलीप शिंदे, कॉन्ट्रॅक्टर सुवर्णसिंह वाघ, इतर अधिकारी आणि ग्रामस्थ जमा झाले. भोरवाडी बाजूकडून पुलाच्या बाजूने खाली उतरून नंतर तांबडेमळा गावाकडे जाणार्‍या पुलाच्या अलीकडे बाजूला असणार्‍या सर्व्हिस रस्त्याला हा सर्व्हिस रस्ता मिळणार आहे.

परंतु, हा रस्ता कसा असणार आहे, हे मात्र नागरिकांना समजले नाही. शासनाने या रस्त्याला मोर्‍यांचा पूल टाकला तर त्यावर पावसाळ्यात पाणी राहणार आहे, त्या वेळी विद्यार्थी व शेतकरी वाहतूक कशी करणार, हा देखील प्रश्न असेल. त्यासाठी सर्व्हिस रस्त्यांवर मोठ्या उंचीचा पूल तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या वेळी नॅशनल हायवे उपअभियंता दिलीप शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे सांगितले. कॉन्ट्रॅक्टर सुवर्णसिंह वाघ यांनी सर्व्हिस रस्त्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल, असे सांगितले.

रस्ते विभागाने या परिसरात सर्व्हिस रस्ता बनविताना स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सर्व्हिस रस्ता चांगला असावा आणि रुंद असावा.

– विकास भोर, माजी ग्रामपंचायत सदस्य

सर्व्हिस रस्ता हा भोरवाडीकडे जाणार्‍या प्रवेशद्वारापुढील बंटी हॉटेलपर्यंतच असणार आहे. यासंदर्भात नागरिकांनी हा रस्ता कानिफनाथ मंदिरापर्यंत करावा.

– प्रवीण भोर, ग्रामपंचायत सदस्य

हेही वाचा

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा !

मंचर : डोंगर माळरानावर जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

नगर : खासगी दूध संघाचा टँकर सिन्नरमध्ये पकडला

Back to top button