नगर : खासगी दूध संघाचा टँकर सिन्नरमध्ये पकडला

नगर : खासगी दूध संघाचा टँकर सिन्नरमध्ये पकडला

संगमनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरानजीक कसारा दुमाला येथील एका खासगी दूध संघाच्या दुधाचा टँकर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनासह जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आणि अन्न चाचणी प्रयोगशाळेच्या संयुक्त पथकाने घोटी शिवारात पकडला. तपासणी केली असता टँकरमधील दुधात भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्याने टँकर ताब्यात घेतला. नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उल्हास लोहोकरे यांनी मुंबईकडे जाणार्‍या विविध चार दुधाच्या टँकरमधील 66, 763 लिटर दुधाची जागेवर तपासणी केली.

या कारवाईत कासारा दुमाला शिवारातील 'प्रवरा मिल्क प्रोसेसिंग' या खासगी दूध डेअरीतून 3320 लिटर दूध घेवून निघालेला टँकर (क्र. एम. एच. 48 / ए. जी. 4692) सिन्नर-घोटी मार्गावर भाटवाडी शिवारात अड वून त्यातील दुधाचे नमूने तपासले असता भेसळ असल्याची चाचणी सकारात्मक आली. यामुळे पथकाने टँकरमधून वेगवेगळे चार दुधाचे नमुने घेवून तपासणी केली असता भेसळयुक्त दुधाची जागेवर विल्हेवाट लावली. नष्ट केलेल्या दुधाची किंमत 1.13 लाख रुपये आहे. दुधाचे नमुने अधिक तपासणीस पाठविले आहेत. अहवाल प्राप्त होताच खासगी दूध डेअरीवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये कारवाई होईल. अन्न सुरक्षा अधिकारी सु. दे. महाजन, योगेश देशमुख, अमित रासकर, गोपाल कासार, एस. के. पाटील,मनीष सानप, उल्हास लोहकरे, योगेश नागरे, निवृत्ती साबळे, विजय पगारे व संजय नारागुडे कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news