मंचर : डोंगर माळरानावर जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग | पुढारी

मंचर : डोंगर माळरानावर जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जसा जसा काळ बदलत आहे, तसेतसे शेतीचे स्वरूप बदलत आहे. उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळल्याने अनेक वेगवेगळे प्रयोग शेतीत केले जात आहेत. आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथील एक निवृत्त शिक्षक आणि त्यांच्या मुलाने डोंगर भागात शेती विकत घेऊन ती विकसित करून त्यावर जांभळाच्या शेतीचा भन्नाट प्रयोग केला आहे. इतकेच नाही, तर जांभळाच्या झाडाला कलम करून त्यातून जंबो जांभूळ पिकवले आहेत. या शेतीची सद्या चर्चा होऊ लागली आहे.

विष्णू मारुती कुटे हे शिक्षक होते. काही दिवसांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यांचा मुलगा ज्ञानेश विष्णू कुटे हेदेखील उच्चशिक्षित आहे. त्यांनी गिरवली भागात आठ एकर डोंगर विकत घेतला. त्यात आधुनिक आणि स्मार्ट शेती करता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यावर त्यांना जांभूळ शेतीची संकल्पना समोर आली. त्यातून त्यांनी 2014 मध्ये साडेतीन एकर क्षेत्रात जांभळाची 200 झाडे लावली. मात्र, त्यातील काही रोप वेगळ्या वाणाची निघाली. त्यावेळी त्यांनी यासाठी आणखी अभ्यास करून या वेगळ्या जांभळाच्या वाणाना जंबो जांभळाचे रीकलम केले. त्यांना त्यात यश मिळाले. सद्यस्थितीत त्यांना जंबो जांभूळ लागले आहेत. त्यांना मागच्या वर्षी जांभळाच्या उत्पादनातून 10 लाखांपर्यंत नफा मिळाला होता.

यंदाच्या वर्षी विचित्र वातावरण असतानाही जांभळाच्या शेतीतून अंदाजे 11 ते 12 लाख रुपयांपर्यंत नफा मिळण्याची आशा ज्ञानेश कुटे यांनी व्यक्त केली आहे. डोंगरावर शेती घेऊन ती पुन्हा शेतीयोग्य बनवण्याची किमया या बाप-लेकांनी केली आहे. डोंगर माळरानावर स्मार्ट शेती करत ती यशस्वी करून दाखवण्याचे काम या बाप-लेकांनी केले आहे. संपूर्ण कुटुंब ही शेती करण्यासाठी त्यांना मदत करत असून, त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या प्रयोगाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. त्याच्या शेतीला भेट देण्यासाठी दूरवरून शेतकरी येत असल्याचे गिरवलीचे प्रभारी सरपंच आणि आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष सैद यांनी सांगितले.

जांभळाला विदेशातून मागणी

सध्या या जांभळाची निर्यात पुणे आणि मुंबईप्रमाणेच हाँगकाँगलादेखील होत आहे. तसेच बि—टन, युरोप, दुबई या देशातून या जांभळाला मागणी येत आहे. मात्र, सध्या तेवढे उत्पादन निघत नसल्याने येणार्‍या काळात तिकडेही माल निर्यात करण्याचा मानस ज्ञानेश कुटे यांनी बोलून दाखवला. या शेतीमध्ये जांभळाच्या वाणाला करण्यात आलेला कलम हा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचेदेखील कुटे यांनी सांगितले.

हेही वाचा

नगर : खासगी दूध संघाचा टँकर सिन्नरमध्ये पकडला

नगर : राहात्याचे सोनवणे अजित पवार गटामध्ये

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा !

Back to top button