पुण्यात होणार्‍या आउटडोअर चित्रीकरणाला पावसाचा फटका | पुढारी

पुण्यात होणार्‍या आउटडोअर चित्रीकरणाला पावसाचा फटका

सुवर्णा चव्हाण

पुणे : चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंतच्या पुण्यात होणार्‍या चित्रीकरणावर सध्या पावसाळ्यामुळे परिणाम झाला आहे. अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी पावसाच्या सीझनमुळे आउटडोअर चित्रीकरण थांबविले आहे. निर्माते-दिग्दर्शक इनडोअर चित्रीकरणावर भर देत असून भोर, मुळशी, लोणावळा, कोथरूड आदी ठिकाणी सुरू असलेल्या चित्रीकरणाला पावसाचा फटका बसला आहे.

अनेक निर्माते-दिग्दर्शकांच्या नवीन चित्रपटांचे चित्रीकरण पावसामुळे रखडले असून, त्यांनी सप्टेंबरनंतरच चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आताच्या घडीला चित्रपट, लघुपट, जाहिराती, वेब सीरिज, म्युझिक अल्बमचे इनडोअर चित्रीकरणच सुरू आहे. जोखीम पत्करून आर्थिक नुकसान करण्यापेक्षा आमच्या चित्रपटाचे पुणे आणि कोकणातील आउटडोअर चित्रीकरण थांबविले आहे. पावसामुळे चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याचे नुकसान होते तसेच चित्रीकरणाचे संपूर्ण नियोजन बिघडते. म्हणूनच काही दिवस आउटडोअर चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निर्माते-दिग्दर्शक अमित शेरखाने यांनी सांगितले.

याविषयी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि चित्रपटनिर्माते मेघराज राजेभोसले म्हणाले, मपुण्यात सध्या आउटडोअर चित्रीकरणाचे फारसे प्रमाण नसून, काही निर्माते-दिग्दर्शकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच त्याबाबतचे नियोजन केले होते. सध्या इनडोअर चित्रीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

वेब सीरिज, लघुपटही लांबणीवर

मुंबईनंतर आता पुणेसुद्धा निर्माते-दिग्दर्शकांसाठी चित्रीकरणाचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. पुण्यातील ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न असलेल्या ठिकाणांवर परवानगी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. पावसाळ्याच्या सीझनमुळे आउटडोअर चित्रीकरण करणे शक्य नसल्याने अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी चित्रीकरण थांबविले आहे. त्यात नवीन चित्रपटांची संख्या अधिक आहे, तर त्यासोबतीला वेब सीरिज, लघुपटांचेही चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.

चित्रपट, वेब सीरिज, लघुपट, म्युझिक अल्बमचे इनडोअर चित्रीकरण सध्या केले जात आहे. फक्त मालिकांचे आउटडोअर चित्रीकरण केले जात आहे. सध्या फक्त 30 टक्के आउटडोअर चित्रीकरण सुरू आहे. अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी चित्रीकरण पावसाळ्यानंतर करण्याचे ठरविले आहे.

– नितीन पवार,
दिग्दर्शक

हेही वाचा

श्रीरामपूरच्या तरूणाचा पुणतांब्यात निर्घृण खून

पर्यावरण : ग्रीन हायड्रोजनला चालना

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एसी दुरुस्तीसाठी बंद

Back to top button