

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रभावी उपायोजना करण्यास सुरुवात केली
आहे. वानवडी परिसरात आयटी अभियंता महिलेला निर्जनस्थळी घेऊन जाऊन एका रिक्षा चालकाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. पुढील कालावधीत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक परिमंडळातील पोलिस उपायुक्तांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांना दैनंदिन कामगिरीचा अहवाल नियंत्रण कक्षाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
आयटी पार्क, मॉल, कार्यालये, शैक्षणिक संस्था, महिला वसतिगृहे, मोठी रुग्णालये येथे भेट देऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना सांगण्यात आले आहे. आपल्या हद्दीतील विविध कार्यालयांत काम करणार्या महिलांबाबत बडीकॉप, तर शाळा, कॉलेजमधील मुला-मुलींसाठी पोलिसकाका आणि पोलिसदीदी या योजना तत्काळ सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
विशेषत: म्हणजे रात्रीच्यावेळी कामाच्या ठिकाणाहून सुटणार्या परिसरात पोलिसांना काटेकोर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेवा देणार्या टॅक्सी, रिक्षा यांच्या कार्यालयाची माहिती गोळा करण्यात यावी. महिन्यातून किमान एकदा मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे तसेच सर्व वाहनचालकांच्या बाबत चारित्र्य पडताळणी करून माहिती अद्यावत ठेवण्यात येणार आहे.
रात्रीच्यावेळी अवैध पद्धतीने वाहने चालविणार्यांवर वाहतूक पोलिस, आरटीओ आणि स्थानिक पोलिस संयुक्त पद्धतीने कारवाई करणार आहेत. मध्यरात्री येणार्या-जाणार्या रेल्वेगाड्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यानुसार रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक, विमानतळ परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.
रात्रीच्या निर्धारित वेळेनंतरदेखील अवैध पद्धतीने हॉटेल्स, ढाबे, चायनीज टपर्या, अंडाभुर्जीच्या स्टॉलवर पोलिस कारवाई करणार आहेत. अवैध दारू विक्रीचे गुत्ते नष्ट करावेत. कारण अशा ठिकाणी रात्री गुन्हेगार वावरत असतात.
एखाद्या महिलेने नियंत्रण कक्षाला कॉल करून मदत मागताच, तत्काळ संबंधित पोलिस ठाण्याचे रात्रगस्त अधिकारी, सीआर मोबाईल, बीट मार्शल यांना माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर कॉल करणार्या महिलेला जोपर्यंत मदत मिळून तिचे समाधान होत नाही तोपर्यंत पोलिस त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
हेही वाचा