दिवे : साहेब काही करा, पण आम्हाला पाणी द्या; नागरिकांची आर्त हाक

दिवे : साहेब काही करा, पण आम्हाला पाणी द्या; नागरिकांची आर्त हाक

दिवे (पुणे); पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मधल्या काळात थोडाफार पाऊस झाला परंतु त्याचा ओलावा चार बोटांखाली गेला नाही. पेरणीसाठी अजून दमदार पावसाची आवश्यकता आहे. बाजरी, भुईमूग, वाटाणा या पिकांची पेरणी पूर्णपणे थांबवली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. शेततळ्यातसुध्दा आता पाणी नाही. अंजिर, सीताफळ बहार धोक्यात आला आहे. पाणीच नाही तर द्यायचे कुठून अशी अवस्था शेतकर्‍यांची आहे.

या भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजना आहे परंतु ती पूर्ण क्षमतेने चालवली जात नाही. शेवटच्या टप्प्यात असल्याने अज्ञातांकडून व्हॉल्व्ह खोलून पाणी चोरीचे प्रकार घडतात. याला पाठबळ कुणाचे हा अनुत्तरणीय प्रश्न आहे. अशा लोकांवर कारवाई का होत नाही? संबंधित विभागाच्या देखरेखीखालीच व्हॉल्व्ह खोलले का जात नाहीत? किंवा मग अशा लोकांवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही? पंप हाऊसमधील मोटारी वारंवार नादुरुस्त होतात, त्या वेळेवर का दुरुस्त होत नाहीत हे सर्व अनुत्तरीत प्रश्न आहेत.

दिवे पंप हाऊसमध्ये तर तीन मोटारींपैकी अवघा एकच पंप सुरू आहे. तोदेखील बुधवारी रात्री बंद पडला आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजना जर सुरू झाली नाही तर इथल्या अंजिर, सीताफळाच्या आगाराला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे साहेब काहीतरी करा, परंतु आमच्या मोटारी दुरुस्त करून आम्हाला पाणी द्या, अशी आर्त हाक इथल्या शेतकर्‍यांनी दैनिक 'पुढारी'जवळ व्यक्त केली. पुरंदर उपसा जलसिंचन योजना प्रभावीपणे राबवली, तर इथल्या शेतकर्‍यांना निश्चितच दिलासा मिळेल. सध्या मात्र परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news