धक्कादायक ! स्कूल बसमध्ये अडकली चिमुकली…चालकाच्या हलगर्जीपणाचा परिणाम | पुढारी

धक्कादायक ! स्कूल बसमध्ये अडकली चिमुकली...चालकाच्या हलगर्जीपणाचा परिणाम

पुणे : ‘मी कार्यालयात काम करत होते, इतक्यात माझा फोन वाजला. तो फोन माझ्या मुलीच्या शाळेतील कोण्या एका पालकांचा होता. त्यांनी मला माझी मुलगी बसमध्येच अडकल्याची माहिती देत, ती खूप घाबरल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. हे ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले….’ हे सांगत होत्या पालक तश्नुर कौर. त्या म्हणाल्या, ‘माझ्या आईने कल्याणीनगर येथील एका शाळेत पाठविण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता माझ्या चार वर्षांच्या मुलीला स्कूल बसमध्ये बसविले आणि आम्ही निश्चिंत झालो. दुपार झाली, दीड वाजला पण आम्हाला वाटले मुलगी सुरक्षित शाळेत असेल.

तेवढ्यात एका पालकाचा फोन आम्हाला आला आणि तुमची मुलगी शाळेच्या बसमध्ये एकटीच अडकली आहे आणि रडत आहे. तेथून जात असताना तिने मला ‘काकी मला वाचवा,’ असा आवाज दिला. त्यानंतर आम्ही मुलीला बसमधून बाहेर काढले. गाडीचा चालकदेखील गाडीजवळ नव्हता, असे सांगितले. ही माहिती मिळताच कौर शाळेकडे गेल्या आणि मुलीला ताब्यात घेतले. यासंदर्भात त्यांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, शाळेकडून याची दखलच घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. शालेय विद्यार्थी वाहतूक करताना मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. चालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आरटीओ स्कूल व्हॅनकडे लक्ष देणार का ?
ही घटना एका स्कूल बसमध्ये घडली आहे. ती मुलगी पुणे महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कुटुंबातील आहे. सर्वसामान्य घरातील पालकांची मुले स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. गाडीच्या अंतर्गत रचनेत बदल करून मुलांना सिलिंडवर बसविले जात आहे. याकडे आरटीओ अधिकारी लक्ष देणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ही घटना अतिशय धक्कादायक आहे. मुलीला काही झाले असते तर? शालेय वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हायला हवे. शाळेच्या संचालक, मुख्याध्यापकांनीदेखील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आमच्याकडील इन्स्पेक्टर पाठवून झालेल्या प्रकाराची माहिती घेण्यात येईल आणि संबंधित चालकावर कारवाई करण्यात येईल.
                                         – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करताना त्यांची जबाबदारी घेणे हे स्कूल बसचालक आणि अटेंडन्टचे कर्तव्य आहे. विद्यार्थी उतरल्यानंतर गाडी तपासली पाहिजे. शालेय नियमावलीतसुद्धा हे नमूद करण्यात आले आहे. त्याप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. घडलेला प्रकार हा चुकीचा आहे.
                           – बाबा शिंदे, माजी सदस्य, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे, ही संबंधित गाडीच्या चालक- अटेंडन्टची जबाबदारी आहे. घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. सर्वांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना मुलांची काळजी घ्यावी.
                                    – एकनाथ ढोले, अध्यक्ष, शालेय वाहतूक संघटना

हे ही वाचा : 

Karnataka Budget 2023 | कर्नाटक अर्थसंकल्प : सर्वजन सुखाय, मद्यपी दुःखाय!   

आरटीई प्रवेशाच्या 20 हजारांवर जागा रिक्तच !

Back to top button