आरटीई प्रवेशाच्या 20 हजारांवर जागा रिक्तच ! | पुढारी

आरटीई प्रवेशाच्या 20 हजारांवर जागा रिक्तच !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राबविण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील दुसर्‍या टप्प्याची मुदत शुक्रवारी संपली. आतापर्यंत 81 हजार 33 मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, साधारण 20 हजार 813 जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीई अंतर्गत राज्यातील दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो. त्यानुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 जागा उपलब्ध होत्या.

त्यासाठी 3 लाख 64 हजार 413 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. नियमित फेरीसाठी 94 हजार 700 मुलांना प्रवेश जाहीर झाला होता. तर, पहिल्या प्रतीक्षा यादीत 81 हजार 129 मुले होती. त्यामुळे आरटीईअंतर्गत मोठ्या संख्येने प्रवेश होण्याची शक्यता होती. मात्र, कमी प्रवेश झाल्याचे चित्र आहे. आरटीईतून ठरलेल्या नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश व्हावा, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे जवळपास प्रवेश क्षमतेच्या चौपट अर्ज प्रवेश प्रक्रियेत येतात. प्रत्यक्षात नामांकित शाळांमध्ये प्रवेश जाहीर होत नसल्याने, पालक प्रवेश घेत नसल्याचे चित्र आहे. या सर्वांचा फटका हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ इच्छिणार्‍या गरजू मुलांना बसत आहे. प्रवेश प्रक्रियेत वाढलेल्या अर्जांच्या संख्येमुळे या मुलांचे प्रवेश जाहीर होत नसल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यात 1854 जागा रिक्त
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 935 शाळांमध्ये 15 हजार 596 जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी 77 हजार 531 पालकांनी अर्ज केले होते. त्यातून एकूण 21 हजार 622 मुलांना प्रवेश जाहीर झाले होते. त्यापैकी 13 हजार 742 मुलांनी, त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे 1 हजार 854 जागा रिक्त राहिल्या आहेत.

हे ही वाचा :

सोनवडीत महिलेवर सामूहिक बलात्कार; कोळसाभट्टी मालकासह ५ जणांचे दुष्कृत्य

पोलिस- दरोडेखोरांमध्ये मध्यरात्री थरार ! पुणे पोलिसांवर दरोडा टाकणाऱ्या टोळक्याचा हल्ला

Back to top button