जायचे होते स्कूलबसने, पण आली रुग्णवाहिका ! | पुढारी

जायचे होते स्कूलबसने, पण आली रुग्णवाहिका !

वडगाव मावळ : शाळेत जायचे म्हणून गणवेश घालून दूध-चपाती खाऊन तो तयार होता. तेवढ्यात त्याची आवडती चिमणी आली म्हणून तिला दाणे टाकण्यासाठी तो छतावर गेला आणि काळाने घाला घातला. छतावरून खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अन् स्कूल बसने शाळेत जाण्याऐवजी तो रुग्णवाहिकेने रुग्णालयात गेला. अशी मनाला चटका लावणारी घटना वडगाव मावळ येथे घडली.

अभिनव जगदीश कडभने (वय 13, रा. वडगाव मावळ) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. अभिनव हा येथील श्री रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होता. जगदीश कडभने हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून, ते कामाच्या निमित्ताने वडगाव मावळ येथील श्री संभाजीनगर सोसायटीत वास्तव्यास आहेत. अभिनव हा त्यांचा थोरला मुलगा, अभिनवला त्यांच्या बिल्डिंगमध्ये दररोज येणार्‍या चिमणी विषयी विशेष प्रेम जडले होते.

चिमणीवर होते विशेष प्रेम
चिमणी आली की अभिनव तिला पाहण्यासाठी बाहेर जायचा. बुधवारी सकाळी अभिनवला आवरायला थोडा वेळ झाला म्हणून तो शाळेचा गणवेश घालून जेवणाला बसला. गरम गरम चपाती आणि दूध खात असतानाच त्याला त्याच्या आवडत्या चिमणीचा खिडकीतून आवाज आला व चिमणी इमारतीच्या छतावर गेल्याचे त्याने पाहिले. त्यामुळे तो चिमणीला पाहायला आणि तिला दाणे टाकायला म्हणून
छतावर गेला.

सोसायटीतील नागरिकांनी अभिनवला तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात नेले. दरम्यान, अभिनवला रुग्णवाहिकेतून नेत असताना त्याला शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूलबस आली, पण रक्ताने माखलेल्या अभिनवला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. हा हृदयद्रावक प्रसंग घडल्याने संपूर्ण वडगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिक्षक, पालक अन् विद्यार्थीही गहिवरले

अभिनव शिकत असलेल्या रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये ही बातमी समजली आणि शाळेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, वर्गशिक्षक यांना धक्काच बसला. शाळेत दिवसभर फक्त अभिनवचीच चर्चा होती. व्यवस्थापनाने या दुर्दैवी घटनेमुळे एक दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. सुटीचे कारण ऐकून विद्यार्थीही गहिवरून गेले. शाळा सुटल्यावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना अभिनवच्या दुर्दैवी घटनेबाबत सांगताना गहिवरून गेलेला दिसत होता.

शेवाळलेल्या भिंतीवरून घसरल्याने दुर्घटना
छताच्या भिंतीवर बसून तो तिचे निरीक्षण करीत होता. तेवढ्यात शाळेला निघण्याची वेळ झाल्याने त्याचे वडील त्याला बोलावण्यासाठी छतावर आले. वडिलांनी हाक मारलेली हाक ऐकून छताच्या भिंतीवरून उठून निघत असताना शेवाळलेल्या भिंतीवरून तो घसरला आणि चार मजली इमारतीच्या छतावरून खाली पडला. वडिलांच्या डोळ्यादेखत  मुलगा खाली पडला, वडिलांनी जोरात हंबरडा फोडला खाली जाऊन पाहिले असता अभिनव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

हे ही वाचा :

भवानीनगर : श्री छत्रपती कारखान्याचे संचालक मंडळ व शेतकरी कृती समिती यांच्यात तुंबळ बाचाबाची

पिंपरी : सांगवीमध्ये तरुणावर खुनी हल्ला

Back to top button