

भवानीनगर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : 'श्री छत्रपती कारखान्यामधुन नियमाप्रमाणे मतदार याद्या दिल्या जात नाही', असा आरोप करीत कारखान्याचे संचालक मंडळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेतकरी कृती समिती यांच्यात तुंबळ बाचाबाची झाली. नियमाप्रमाणे मतदार यादी दिल्या जात नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी सकाळी 11 वाजता साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या कार्यालयीन इमारतीला टाळे ठोक आंदोलन करण्यासाठी शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील जमले होते. दरम्यान जाचक यांनी कार्यकारी संचालक अशोक जाधव यांना "तुम्ही नियमाप्रमाणे याद्या का देत नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी बाहेर या" असे म्हटले.
त्यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ देखील चर्चेसाठी येऊन उभे राहिले. जाचक यांनी कार्यकारी संचालकांना प्रश्न विचारल्यानंतर कारखान्याचे संचालक अॅड रणजीत निंबाळकर यांनी प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी जाचक म्हणाले, "संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही." यावरून उपस्थित असलेल्या संचालक मंडळामध्ये व शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली शाब्दिक चकमक सुरू झाली. याबरोबर जाचक व निंबाळकर यांच्यामध्ये देखील खडाजंगी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना बाजूला नेले व शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जाचक यांना बाजूला नेले व काही वेळ वातावरण शांत झाले. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे म्हणाले, "कार्यकारी संचालकांवर दबाव टाकू नका सनदशीर मार्गाने जावा संचालक मंडळ उत्तर देण्यास तयार आहे". काटे यांनी दोन्ही बाजूंनी तंग झालेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, रणजीत निंबाळकर, राजेंद्र गावडे, दत्तात्रय सपकळ, रसिक सरक, सर्जेराव जामदार, लक्ष्मणराव शिंगाडेे, नारायण कोळेकर, निवृत्ती सोनवणे, कार्यकारी संचालक अशोक जाधव प्रशांत पवार, राहुल चव्हाण, बापूराव पांढरे, शेतकरी कृती समितीचे सतीश काटे, अण्णा पाटील, संभाजीराव काटे, विशाल निंबाळकर, शहाजी शिंदे, शिवाजी निंबाळकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा :