पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील सुविधांसाठी समिती | पुढारी

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील सुविधांसाठी समिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अहवाल तयार करण्यासाठी 12 जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिका हद्दीत 34 गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे; परंतु मागील चार-पाच वर्षांत या गावांमध्ये अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. गावातील नागरिक पूर्वीपेक्षा अधिकचा कर देत असूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडूनही तक्रारी करण्यात येत आहेत. शहरातील आमदारांनीही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे.

यानंतर राज्य शाससाने समाविष्ट गावांतील सेवा, सुविधांचा समग्र अहवाल तयार करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. समाविष्ट गावांमध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, पावसाळी गटारे, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, आरोग्य व अन्य सुविधांची वस्तुस्थिती, आवश्यक कामे, महापालिकेने केलेली निधीची तरतूद आणि राज्य शासनाकडून अपेक्षित निधी असा विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम या समितीकडे असेल.

शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समाविष्ट गावांच्या समितीसाठी नुकतीच एक बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि महापालिकेच्या संबधित झोनचे उपायुक्त उपस्थित होते. या बैठकीमध्ये अहवाल कशा पद्धतीने तयार करायचा यासोबतच प्रत्येकी तीन गावांतून एक या पद्धतीने 12 सदस्यांना समितीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

हेही वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षपदी दिपक मानकर

अजित पवारांच्या एन्ट्रीने बारामतीत भाजपपुढे पेच

भारतीय विद्यार्थिनीला कबरीत जिवंत गाडले

Back to top button