भारतीय विद्यार्थिनीला कबरीत जिवंत गाडले | पुढारी

भारतीय विद्यार्थिनीला कबरीत जिवंत गाडले

कॅनबेरा, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियातील जस्मिन कौर नावाच्या 21 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला तिच्या माजी प्रियकराने जिवंत पुरल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे. माझा विवाहाचा प्रस्ताव तिने फेटाळून लावल्यामुळे मी तिची हत्या केली, अशी कबुली यातील आरोपी तारिकजोत सिंग याने दिली आहे. या प्रकरणात तो दोषी आढळल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाणार आहे.

यासंदर्भात कॅनबेरातील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मार्च 2021 मध्ये नातेसंबंध संपुष्टात आणल्यानंतर या विद्यार्थिनीला जिवंत गाडण्यात आले होते, असे न्यायालयात सुनावणीदरम्यान उघड झाले. दुर्दैवी विद्यार्थिनी जस्मिन अ‍ॅडलेड शहरात नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. 5 मार्च 2021 रोजी जस्मिनचे अपहरण तारिकजोत याने तिच्या कामाच्या ठिकाणाहून केले.

यादरम्यान, त्याने मित्राकडून घेतलेल्या कारमध्ये जस्मिनला केबलद्वारे बांधून ठेवले आणि सुमारे 650 कि.मी. अंतर कापले. नंतर त्याने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्याने तिला दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यात दुर्गम ठिकाणी नेऊन कबरीत जिवंत पुरले. न्यायालयातील सुनावणीवेळी जस्मिनची आईदेखील उपस्थित होती. खटल्याचा तपशील ऐकताना मुलीच्या आठवणीने त्यांचे डोळे क्षणाक्षणाला पाणावत असल्याचे दिसून आले.

Back to top button