अजित पवारांच्या एन्ट्रीने बारामतीत भाजपपुढे पेच

राजेंद्र गलांडे
बारामती : राज्यातील सत्तेमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद मिळविल्याने बारामतीत भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. बारामतीत पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न सुरू असतानाच आता पवारांची सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने येथील भाजप पदाधिकार्यांची घुसमट होण्याचीच अधिक शक्यता आहे. पवार यांच्या शपथविधीपासूनच त्याचा प्रत्यय येऊ लागला असून, सोशल मीडियावर भाजप पदाधिकार्यांना खिंडीत गाठले जात आहे.
बारामतीत अलीकडील काळात भाजप पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बारामतीत लक्ष घातले होते. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले होते.
खुद्द पवारांच्या काटेवाडी गावात जात त्यांनी कार्यक्रम घेतला होता. गतआठवड्यातही बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला. या वेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती; परंतु अजित पवारांवर टीका करणे कटाक्षाने टाळले होते. मोदी ऽ 9 कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपकडून तालुक्यात संघटन बळकट करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अजित पवार हे सत्तेत गेले, त्यामुळे येथील भाजपपुढे आता मोठा पेच निर्माण झाला आहे.
पक्षाची ताकद मर्यादित असताना पवार विरोधावर येथील भाजप पदाधिकार्यांचे राजकारण सुरू होते. बारामती तालुक्यातील पाण्याचा प्रश्न असो की शहरातील सुशोभीकरणाचा मुद्दा असो, भाजप नेहमीच अजित पवार यांच्यावर टीका करत आला होता. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना बारामतीत काँग्रेसला राष्ट्रवादीकडून फारशी सन्मानाची वागणूक कधीच मिळाली नव्हती. व्यासपीठावरही निवडणुकीपुरते स्थान दिले जात होते. भविष्यात शिवसेना, भाजप व अजित पवारांचा गट एकत्रित निवडणुकीला सामोरे गेला तर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे काय? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पवारांकडून सन्मानाची अपेक्षा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेधडक कामाची बारामतीकरांना माहिती आहे. बारामतीत विरोधकांना ते अनुल्लेखाने मारतात. आता भाजपसोबत ते गेले आहेत. या स्थितीत बारामतीत ते भाजप पदाधिकार्यांना सोबत घेणार का? हा खरा प्रश्न आहे. अजित पवार यांच्यासोबत एकेकाळी असणारे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे आदी लोक भाजपमध्ये आहेत. भाजप कार्यकर्त्यांना पवारांकडून सन्मानाची अपेक्षा आहे.
पवार उपमुख्यमंत्री; फ्लेक्स भाजपचे
अजित पवार हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर बारामतीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या फ्लेक्सची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या फ्लेक्सवर पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यावर ‘चाणक्य’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
लोकसभेची जबाबदारी पवारांकडे?
बारामती लोकसभेची जबाबदारी भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे दिली होती. भाजपला केंद्रात मोदींचे हात अधिक बळकट करायचे आहेत. आता बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजपला ही जागा काहीही करून जिंकायची आहे. त्यामुळे लोकसभेच्या समन्वयाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडेच दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांच्या भाजपसोबत सत्तेत जाण्याने बारामतीत भाजपला बळकटी मिळाली आहे. आम्ही आजवर प्रस्थापितांविरोधात येथे लढा देत आलो आहोत. वरिष्ठ सांगतील त्यानुसार पक्षाचे काम आम्ही बारामतीत करू.
दिलीप खैरे,
सदस्य, भाजप प्रदेश कार्यकारिणीआमची लढाई तत्त्वाची होती. ती नेहमीच सुरू राहील. अजित पवार यांचा भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे; परंतु आम्ही बारामती तालुक्यात पक्षाचे काम यापुढेही जोमाने सुरू ठेवू.
रंजनकुमार तावरे,
समन्वयक, बारामती विधानसभा, भाजप
हेही वाचा
पुण्यातील पोलिसही असुरक्षित! काचेच्या ट्युबने मारहाण
मंत्री मुश्रीफ आज कोल्हापुरात; जंगी स्वागत : कागलमध्ये मेळावा