कुरकुंभ एमआयडीसीतील पार्किंगच्या अधिकृत भूखंडांची केली विक्री | पुढारी

कुरकुंभ एमआयडीसीतील पार्किंगच्या अधिकृत भूखंडांची केली विक्री

अजय कांबळे

कुरकुंभ(पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील वाहन पार्किंगचा अधिकृत भूखंडांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिणामी, सर्व वाहने धोकादायक पध्दतीने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केली जातात. या प्रकारामुळे दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ आणि कुरकुंभ पांढरेवाडी हद्दीत सन 1989 मध्ये औद्योगिक क्षेत्र घोषित करून कामाला सुरुवात झाली. कुरकुंभ, पांढरेवाडी हद्दीत 473.22 हेक्टर जमिनीवर औद्योगिक क्षेत्र स्थापन केले. कामदेखील पूर्ण झाले. या ठिकाणी साधारण 150 ते 200 पेक्षा कारखाने आहे. यामध्ये 20 मोठे नामांकित कारखाने आहे.

रासायनिक पदार्थांचे उत्पादन घेणार्‍या उद्योगांची प्रचंड मोठी संख्या आहे. काही प्रमाणात फूट झोन आहे. कारखान्यासंबंधी लागणारे रासायनिक पदार्थ, कच्चा माल, यासह विविध वस्तूंची टँकर, ट्रक व अवजड वाहनांतून वाहतूक केली जाते. कारखान्यात माल उतरून घेण्यास व बाहेर पाठविण्यासाठी वरील वाहने, ज्वलनशील रसायन (केमिकल) पदार्थ असलेले टँकर, कर्मचारी वाहतूक बस धोकादायक पध्दतीने तासन् तास रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उभ्या केल्या जातात. रासायनिक पदार्थांने भरलेल्या टँकरची सुरक्षितता तशी खूप महत्त्वाची आहे. मात्र, याचे गांभीर्य कोणालाही राहिले नाही. दररोज वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येते.

इतक्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात वाहन पार्किंगचे गांभीर्य लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न आहे. परिसरात सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. रस्त्यावर दोन्ही बाजूंना उभ्या केलेल्या वाहनांमुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वाहने रस्त्यावरील चढ किंवा उतारावर धोकादायक पध्दतीने लावलेली असतात. चालक जागेवर नसतात. वास्तविक पाहता, रासायनिक झोनच्या दृष्टीने येथे सर्व सुविधायुक्त मोठी पार्किंग व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यासाठी काही प्रमाणात (क्षेत्र) भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात या राखीव भूखंडाची विक्री केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, एकूण किती भूखंड होता, किती विक्री केला, किती शिल्लक आहे यासंदर्भातील माहिती प्रशासनाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

महामंडळाने पुढाकार घेण्याची गरज

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात कच्चा माल, रसायन (केमिकल) घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे. अशी वाहने लावण्यासाठी मोठ्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ कुरकुंभ यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

हेही वाचा

पुणे : ‘लव्ह जिहाद’चा रंग देणार्‍यांना चपराक

हिंगोली : भेंडेगाव शिवारात रेल्वे रुळाजवळ सापडला महिलेचा मृतदेह

Samantha Ruth : काय सामंथाचं आजारपण वाढलं! ब्रेक घेत निर्मात्यांचे पैसेही केले परत?

Back to top button