हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते पूर्णा रेल्वेमार्गावर भेंडेगाव शिवारातील रेल्वे रुळाजवळ एका महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. कुरुंदा पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. ही महिला जालना येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
भेंडेगाव शिवारातील रेल्वे मार्गावर एका महिलेचा मृतदेह असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्याला आज सकाळी दिसले. त्यांनी तातडीने कुरुंदा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, शंकर भिसे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रथम पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर परिसरातील बेपत्ता महिलेची माहिती घेण्यास सुरवात केली. तसेच मृत महिलेच्या जवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात मतदान कार्ड आढळून आले. त्यावरून सदर महिला जालना येथील असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यावरून पोलिसांनी संबंधित महिलेच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, सदर महिला मागील काही दिवसांपुर्वी विदर्भात गेली होती. त्यानंतर तेथून रेल्वेने जालना येथे निघाली असताना रेल्वेतून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :