मंचर : दुचाकीवरून जाणार्‍या बाप-लेकावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

मंचर : दुचाकीवरून जाणार्‍या बाप-लेकावर बिबट्याचा हल्ला

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चारचाकी वाहन आणण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या बाप-लेकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. लौकी (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 4) रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मागील एक ते दोन वर्षांपासून या परिसरात बिबट्यांनी अनेक नागरिकांवर हल्ले केले आहेत. प्रशासनाने या परिसरात बिबट्यांच्या होणार्‍या हल्ल्यापासून कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

रविराज काळुराम धुमाळ व काळुराम धुमाळ (दोघे रा. पेठ, ता. आंबेगाव) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत. मंगळवारी रात्री कळंब-लौकी रस्त्यावर देवराम गणपत थोरात यांच्या विहिरीजवळ बिबट्याने दीपक थोरात या दुचाकीस्वारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यामध्ये दीपक हे बचावले. मात्र, त्यांच्या मागून दुचाकीवरून येणारे रविराज धुमाळ व त्याचे वडील काळुराम धुमाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये दोघांच्या पायाच्या टाचेला जखमा झाल्या आहेत.

दोघांनीही मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. नागरिकांना पाहून बिबट्याने तेथून पळ काढला. मदतीला धावून येणार्‍या नागरिकांना या वेळी तीन बिबटे दिसले. त्यातील एका बिबट्याने धुमाळ बाप-लेकावर हल्ला केला. दरम्यान, धुमाळ बाप-लेकांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनपाल शशिकांत मडके यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील चास, कळंब, चांडोली बुद्रुक, चांडोली खुर्द या गावांमध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. या वारंवार होणार्‍या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतात कामे करताना देखील दिवसाही बिबट्यांचे दर्शन होत असते. अनेकवेळा शेतात कामे करण्यासाठी शेतकर्‍यांना एकत्र येऊन ग्रुपने शेतीची कामे करावी लागत आहेत.

– संदीप थोरात, संचालक, कृषी बाजार समिती, मंचर

हेही वाचा

शिरूर लोकसभेत दोन्ही पवारांना पन्नास-पन्नास टक्के पाठिंबा!

पडसाद भूकंपाचे : कर्मभूमीतच शरद पवारांकडे उरला नाही शिलेदार

पंढरपूर वारीचा जागतिक वारसा यादीत होणार समावेश

Back to top button