सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : राज्याच्या राजकारणात बुधवार (दि.5) सर्वांत मोठा शक्तिप्रदर्शनाचा ठरला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मुंबईत एकाच दिवशी बैठक बोलवत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार आणि हडपसरचे आमदार चैतन तुपे शरद पवार यांच्या बैठकील उपस्थित होते. तर खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत हजर होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आजारी असल्याचे सांगत दोन्ही बैठकीकडे पाठ फिरवल्याने ते साहेब की दादा तळ्यात -मळ्यात असल्याचे स्पष्ट झाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाचही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व खासदार पहिल्या दिवशी अजित पवार यांच्या शपथविधी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. परंतु नंतरच्या दोन दिवसांत गेले अनेक महिन्यांपासून भाजपच्या वाटेवर असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका बदलून शरद पवार यांना पाठिंबा दिला.
त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकांना अमोल कोल्हे, अशोक पवार, चैतन तुपे शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. तर आंबेगावचे आमदार व मंत्रिपदाची शपथ घेतले दिलीप वळसे-पाटील आणि दिलीप मोहिते-पाटील अजित पवार यांच्या बैठकीसाठी उपस्थित होते. भोसरी विधानसभा मतदारसंघातील बहुतेक सर्व कार्यकर्ते अजित पवार यांच्या बैठकील उपस्थित होते. यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून पवार कुटुंबाला पन्नास पन्नास टक्के पाठिंबा मिळाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसे पाहिले तर, सुरुवातीपासून अजित पवार समर्थक म्हणूनच ओळखले जात आहेत. अजित पवार यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमालादेखील ते जातीने उपस्थित होते. परंतु खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी एका दिवसात भूमिका बदलत शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तसेच शरद पवार यांनी आपली पहिली सभा शिवनेरीपासून सुरू करणार असल्याचे कराड दौर्यात जाहीर केले. या दोन्ही कारणांमुळे अतुल बेनके यांचा संभ्रम वाढला असून, शरद पवार यांना पाठिंबा द्यायचा की अजित पवार यांच्या सोबत राहायचे याचा निर्णय घेणे बेनके यांना कठीण झाले आहे. यामुळेच आजारी असल्याचे सांगत बुधवारी बेनके यांनी दोन्ही बैठकांकडे पाठ फिरवली.
हेही वाचा