मुंबई/नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 2 जुलै रोजी घेण्यापूर्वीच 30 जून रोजी अजित पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी करण्यात आली आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची हकालपट्टी झाली. या धाडसी निर्णयाची कानोकान खबर अजित पवार गटाने महाराष्ट्राला तब्बल 6 दिवस लागू दिली नाही.
अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवला असून, 30 जून रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतच अजित पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असे अजित पवार यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. प्रत्यक्षात काकांना हटवून मीच आता राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे त्यांनी आयोगाला कळवूनदेखील टाकले होते. अजित पवार यांनी बंड करण्याच्या दोन दिवस आधी हा ई-मेल पाठविण्यात आला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही बैठक बोलावली होती, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी आमचीच, असे सांगत शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. चाळीस आमदार-खासदारांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. अजित पवार गटाच्या याचिकेवर निर्णय देण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यावी, असे कॅव्हेट शरद पवार गटाकडून आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटांच्या अर्जांवर आयोगाकडून काही दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
शरद पवार यांनी 1999 साली स्थापन केलेल्या राष्ट्रवादीमधील फूट म्हणजे शिवसेनेतील फुटीची पुनरावृत्ती होय. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आयोगाकडे पक्षावर हक्क सांगितला. गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेही आधी मुख्यमंत्री झाले आणि मग आयोगाकडे जाऊन त्यांनी पक्ष, चिन्हावर दावा केला होता.
लोककल्याणाच्या उद्देशापासून राष्ट्रवादी काँग्रेस दूर जात असल्याने पक्षाच्या 30 जून रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्याऐवजी अजित पवार यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करण्यात आल्याचे अजित पवार गटाने आयोगाला पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.