पुणे रेल्वे यार्ड रिमॉडेलिंगचा आराखडा तयार | पुढारी

पुणे रेल्वे यार्ड रिमॉडेलिंगचा आराखडा तयार

प्रसाद जगताप : 
पुणे :  बर्‍याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पुणे रेल्वे यार्ड रिमॉडेलिंगचे काम लवकरच सुरू होणार असून, त्याच्या कामाचा अ‍ॅक्शन प्लॅन म्हणजेच आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्लॅनची रेल्वेच्या सर्व विभागांकडून तपासणी सुरू असून, सध्या रेल्वेचा बांधकाम विभाग या प्लॅनवर अभ्यास करीत आहे.
वाहतूक बंद न ठेवता  ब्लॉक घेऊन कामे होणार…
रेल्वेच्या ऑपरेटिंग, विद्युतीकरण, सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअर (रेल्वे ट्रॅक सिस्टिम), सीएनडब्ल्यू, ईटीएल (इलेक्ट्रिकल ट्रेन लायटिंग), लोको, आरपीएफ, कमर्शिअल या सर्व विभागांकडून पुणे यार्ड रिमॉडेलिंगच्या प्लॅनची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीनंतर ज्या वेळी पुणे यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू होईल, त्या वेळी पुणे विमानतळाप्रमाणे पुणे रेल्वे स्थानक बंद ठेवण्यात येणार नाही. प्रवाशांच्या सोईकरिता ब्लॉक घेऊन येथील यार्ड रिमॉडेलिंगचे काम केले जाणार आहे.
ही कामे आहेत प्रस्तावित
पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार असून, सर्व प्लॅटफॉर्मवर 26 डब्यांच्या गाड्या उभ्या राहणार
पॉइंट्स आणि क्रॉसिंगची कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने रेल्वेलाइनचे अलाइन्मेंट
पुणे स्थानकादरम्यान असणार्‍या सिग्नल यंत्रणेचे अत्याधुनिक पध्दतीने काम होणार
रेल्वे यार्डातील केबलिंग
यार्डची कामे झाल्यावर हा फायदा
प्लॅटफॉर्म लांबी वाढल्याने जास्त डब्यांच्या गाड्या पुणे स्थानकावर थांबणार
जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक होणार
सिग्नलिंगमुळे रेल्वेगाड्यांना तातडीने क्रॉसिंग करता येणार
प्रवाशांचा वेळ वाचणार
प्रशस्त प्लॅटफॉर्मवर थांबता येणार कामासाठी
54 कोटींचा निधी…
पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडलिंगचे काम सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मागील बजेटमध्ये 29 कोटी आणि या वर्षीच्या बजेटमध्ये 25 कोटी असा एकूण 54 कोटींचा निधी रेल्वेच्या पुणे विभागाला मिळाला आहे. त्यामुळे आता यार्ड रिमॉडलिंगचे काम निधीचा अडसर न येता पूर्ण होईल.
पुणे रेल्वे यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाचा प्लॅन तयार झाला आहे. त्याचा आमच्याकडील इतर विभागांकडून अभ्यास सुरू असून, सध्या आमच्याकडीलच बांधकाम विभाग यावर अभ्यास करीत आहे. या प्लॅननुसार पावसाळ्यानंतर पुणे रेल्वे यार्ड रिमॉडलिंगची कामे होतील.
                                                            – इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक,  रेल्वे, पुणे विभाग 
हे ही वाचा : 

Back to top button