पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अठराशे गुन्हेगारांची झाडाझडती

पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अठराशे गुन्हेगारांची झाडाझडती
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आक्रमक झाले आहेत. शहरात 'ऑपरेशन ऑल आउट' राबवून एका रात्रीत अठराशे सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेत तब्बल 159 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एकाचवेळी मंगळवारी मध्यरात्री दोनपर्यंत शहरातील एसटी स्टँड, हॉटेल, रेल्वेस्थानक परिसरासह इतर ठिकाणी तपासणी केली. येथून तब्बल 1 हजार 832 गुन्हेगारांना चेक केले असून, त्यापैकी 639 गुन्हेगार मिळून आले आहेत. तर आर्म्स अ‍ॅक्ट, जुगार अ‍ॅक्टप्रमाणे अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. स्वतःसह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या मोहिमेत सहभागी होते.

शहरात मागील काही दिवसांत वारजे, सहकारनगर भागात सराईत गुन्हेगारांनी दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली. तर, सदाशिव पेठेत एका तरुणाने विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केला. या घटनांची गंभीर दखल पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतली असून, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी सोमवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले.

या विशेष मोहिमेदरम्यान आर्म अ‍ॅक्ट गुन्ह्यांमध्ये 11 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे तसेच 10 धारदार हत्यारे असा 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, परिमंडल-1 च्या हद्दीत दोघांना अटक करून त्यांच्याकडून 5 लाख 9 हजार रुपयांचे 25 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. परिमंडल-2 मध्ये हल्ल्याचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात जणांना अटक करण्यात आली. तसेच, जुगार अ‍ॅक्टप्रमाणे तीन केसेस दाखल करण्यात आल्या. परिमंडल-3 मध्ये अकरा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. परिमंडल-4 मध्ये सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून नऊ हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. परिमंडल-5 च्या हद्दीत 9 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे गुन्हे शाखेने 13 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

28 ठिकाणी नाकाबंदी, 472 जणांवर कारवाई

पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल 28 ठिकाणी नाकाबंदी कारवाई केली. यामध्ये 3 हजार 282 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, नियमभंग करणार्‍या 475 जणांवर दंडात्मक कारवाई केली. वाहतूक शाखेकडून 1 हजार 129 वाहनांची तपासणी करण्यात आली.

दंगा करणार्‍यांची नव्याने कुंडली तयार
दहशत निर्माण करून दंगा करणारे, रात्रीच्या वेळी विनाकारण भटकणारे, वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणारे, रात्री उशिरापर्यंत विनाकारण बसणारी टोळकी, अशा सर्वांची नव्याने पोलिसांनी नोंद घेतली आहे. विशेष करून गर्दीची ठिकाणे, शहरातील बसथांबे यांच्यावर पोलिसांनी रात्रीच्या वेळी लक्ष केंद्रित केले.

गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांची नव्याने कुंडली तयार केली जाते आहे. त्यानुसार कारवाईचे काटेकोर नियोजन केले जाते आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटस्पॉट परिसरावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.
                                                       – संदीप कर्णिक, सह पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news